दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश केला, मग लाखो रुपये घेऊन पसार झाला, पण…
डोंबिवलीत चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून, चोरट्यांना पोलिसांची भितीच राहिली नसल्याचे दिसून येते. चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश करत चोरी केली.
डोंबिवली : डोंबिवलीत एका वाईन शॉपचे शटर उचकटून दुकानात चोरी केल्याची घटना घडली आहे. चोरट्याने दुकानाच्या गल्ल्यातून आठ लाख रुपये चोरी केले. रामनगर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने मुंब्रा आणि मुंबईतून तीन आरोपींना 48 तासांत बेड्या ठोकल्या आहेत. सर्व आरोपी सराईत चोरटे आहेत. सरुउद्दीन ताजउद्दीन शेख आणि जुबेर जलील अन्सारी अशी या दोघांना अटक आरोपींची नावे आहेत. या दोघांवर चोरी, घरफोडी यासारखे 15 गंभीर गुन्हे दाखल आहेत. रामनगर पोलिसांनी या दोघांकडून साडेतीन लाखाची रोख रक्कम जप्त करत अधिक तपास सुरू केला आहे. रामनगर पोलीस आरोपींनी कुठे कुठे चोरी केली याचा तपास करत आहेत.
घटना सीसीटीव्हीत कैद
मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डिलक्स वाईन शॉपमध्ये 12 जून रोजी पहाटे चोरीची घटना घडली. दुकानाचे शटर उचकटवत लोखंडी ग्रील तोडून दुकानात प्रवेश करून दुकानाच्या गल्ल्यातील आठ लाख रुपये अज्ञात चोरट्याने चोरले. चोरीची घटना दुकानातील सीसीटीव्हीत कैद झाली होती. याप्रकरणी वाईन शॉपच्या मालकाने रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
ठाणे अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग दत्तात्रय शिंदे, झोन 3 चे पोलीस उप आयुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त डोंबिवली विभाग सुनिल कुराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि बळवंत भराडे, सपोनि योगेश सानप, भणगे, विशाल वाघ या टीमने कारवाई केली. वाईन शॉपमधील सीसीटीव्ही आणि गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंब्रा आणि मुंबईतून सरुउददीन ताजउद्दीन शेख आणि जुबेर जलील अन्सारी आणि त्यांचा एक साथीदार अशा तीन आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींकडून साडेतीन लाखाची रोख रक्कम जप्त केली आहे.