भरदिवसा इमारतीत करायचा घरफोडी, मानपाडा पोलिसांनी ‘अशा’ आवळल्या मुसक्या
चौकशीत डोंबिवली पोलीस ठाणे आणि विष्णुनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्याचे साथीदारासोबत 10 घरफोड्या केल्याची कबुली दिली. आरोपीकडून 200 ग्रॅम वजनाचे सोने, चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 12 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.
डोंबिवली / सुनील जाधव : वॉचमन आणि सीसीटीव्ही नसलेल्या इमारतीत भरदिवसा घरफोडी करणाऱ्या एका आरोपीला डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हा आरोपी आपल्या साथीदारांसह सुरक्षारक्षक नसलेल्या आणि सीसीटीव्ही नसलेल्या इमारतींची रेखी करायचा. मग संधी मिळताच भर दिवसा कटवणीच्या मदतीने दरवाजा तोडून घरातील लाखोंचे ऐवज घेऊन लंपास व्हायचा. शंकर भिमराव सुर्यवंशी उर्फ धोत्रे उर्फ चेनाळे असे या सराईत चोरट्याचे नाव आहे. मानपाडा पोलिसांनी या आरोपीकडून 10 गुन्हे उघडकीस आणत 12 लाखांचा मुद्देमालही हस्तगत केला आहे.
वाढते गुन्हे पाहता विशेष मोहिम राबवण्याच्या सूचना
गेल्या काही दिवसांपासून मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत भर दिवसा घरफोडी चोरीचे गुन्हे वाढले आहेत. हे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी परिमंडळ 3 चे पोलीस उपआयुक्त सचिन गुंजाळ आणि डोंबिवली सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल कुराडे यांनी डोंबिवली परिसरात विशेष मोहिम राबविण्याबाबत सर्व पोलीस ठाण्याला सूचना दिल्या.
आरोपीला डोंबिवली परिसरातून अटक
वरिष्ठांच्या आदेशानुसार, मानपाडा पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांचे विशेष पथक स्थापन केले. या पथकाने डोंबिवलीमधून एका संशयित आरोपीला अटक केली. शंकर भिमराव सुर्यवंशी उर्फ धोत्रे उर्फ चेनाळे यास ताब्यात घेत चौकशी केली.
आरोपीकडून 10 गुन्ह्यांची कबुली
चौकशीत डोंबिवली पोलीस ठाणे आणि विष्णुनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्याचे साथीदारासोबत 10 घरफोड्या केल्याची कबुली दिली. आरोपीकडून 200 ग्रॅम वजनाचे सोने, चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 12 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. मानपाडा पोलिसांनी या आरोपीला अटक करत त्याच्या साथीदाराचा शोध सुरू केला आहे.