पती पत्नीत असं काय घडलं कि थेट पत्नीवर अॅसिड फेकलं, ऐकून धक्काच बसेल
पती आधी दारु प्यायला मग जेवला. त्यानंतर त्याने पत्नीला चहा देण्यास सांगितले. पत्नीने गॅसवर चहासाठी आंधण ठेवले. मात्र लवकर हातात चहा आला नाही म्हणून पती संतापला.

सुपौल : चहा दिला नाही म्हणून दारुच्या नशेत असलेल्या पतीने पत्नीवर अॅसिड फेकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी नदी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. आरोपी अपंग आणि नशा करणारा आहे. या हल्ल्यात पत्नी जखमी झाली असून, तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना मरौना ब्लॉकच्या नदी क्षेत्राखालील लालमानिया गावातील आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली.
चहा दिला नाही म्हणून पत्नीच्या चेहऱ्यावर अॅसिड टाकले
आरोपी आधी घरी दारुच्या बाटल्या घेऊन आला. दारुच्या बाटल्या आरोपीने संपवल्या मग जेवला. त्यानंतर पत्नीला चहा देण्यास सांगितले. पत्नीने गॅसवर चहा बनवायला ठेवला. मात्र तरीही आरोपी किचनमध्ये गेला आणि त्या चहाच्या भांड्यात बाथरुम साफ करण्याचे अॅसिड टाकले. हे गरम अॅसिड पत्नीच्या चेहऱ्यावर फेकले.
महिलेचा आवाज ऐकून शेजारी धावत आले
आरोपीने दिलेल्या माहितीनुसार, तीन दिवसांपूर्वीही त्याने पत्नीच्या चेहऱ्यावर अॅसिड गरम न करता फेकले होते, त्यात ती वाचली होती. मात्र आज गरम अॅसिड टाकल्याने ती गंभीर जखमी झाली. यानंतर महिलेने आरडाओरडा केल्याने आजूबाजूचे लोक धावत आले. त्यांनी तातडीने तिला रुग्णालयात दाखल केले. यानंतर नागरिकांनी पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पतीला अटक केली.