ड्रग्स माफिया ललीत पाटील प्रकरणात राजकीय नेते?; पोलीस अधिकारी काय म्हणाले?
ललित पाटील ड्रग्ज प्रकरणांमध्ये आतापर्यंत एकूण 14 आरोपींना पोलिसांना अटक केली आहे, तर 10 पोलिसांवर देखील निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत.
ब्रिजभान जैसवार, मुंबई | 9 नोव्हेंबर 2023 : राज्यभरात अंमलीपदार्थांविरोधात पोलिसांनी मोठी मोहीम सुरु केली आहे. राज्यात ड्रग्जचा व्यापार किती खोलवर रुजला आहे याचा भंडाफोड बहुचर्चित ड्रग्ज माफीया ललित पाटील याच्या अटकेनंतर उघडकीस आले आहे. ललित पाटील प्रकरणात रोज नव नवीन आरोपींना अटक होत असून आतापर्यंत या प्रकरणात एकूण 14 आरोपींना अटक झाली आहे. तर ललित पाटील याला मदत करणाऱ्या 10 पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मात्र या प्रकरणात अद्याप तरी कोणा राजकीय व्यक्तीचे नाव पुढे आले नसल्याची माहीती अतिरिक्त पोलीस महासंचालक ( कायदा आणि सुव्यवस्था ) संजय सक्सेना यांनी दिली आहे. या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
ललित पाटील ड्रग्ज प्रकरणांमध्ये आतापर्यंत एकूण 14 आरोपींना पोलिसांना अटक केली आहे, तर 10 पोलिसांवर देखील निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यात तीन पोलीस अधिकारी असे आहेत ज्यांच्या क्षेत्रामध्ये इतर पोलिसांनी शिरकाव करून ड्रग्जचे रॅकेट उध्वस्त करीत कारवाई केली आहे, हे तीन पोलीस अधिकारी नाशिक ,पुणे आणि सोलापूरचे असून त्यांच्यावर पोलिस खाते अंतर्गत चौकशी करून कारवाई करण्यात आली आहे. ड्रग्जचा भंडाफोड करताना एखाद्या स्थानिक पोलिस ठाण्याच्या हद्दीत जाऊन बाहेरच्या विभागातील पोलिसांना धडक कारवाई केली तर स्थानिक पोलिस ठाण्याला जबाबदार धरले जाणार आहे. हा एक प्रकारे हलगर्जी करणाऱ्या पोलिसांना शेवटचा इशारा देण्यात आला आहे.
साखळी शोधून काढणार
तसेच तीन प्रकरणांमध्ये स्थानिक पोलिसांच्या हद्दीत बाहेरील पोलीस यंत्रणांनी जाऊन ड्रग्ज जप्तीची कारवाई केली होती, त्यात पुणे छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक या जिल्ह्यांचा समावेश आहे, जेव्हा एखादा अंमलीपदार्थ जप्त केले जातेय तेव्हा तो अंमलीपदार्थ आला कुठून आणि कुठपर्यंत त्याची साखळी कुठपर्यंत आहे, याची सखोल चौकशी करावी असे स्पष्ट आदेश वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तपास यंत्रणांना दिला आहे .