सणासुदीच्या काळात भेसळयुक्त मिठाईचे संकट ? सहाशे किलो बर्फी केली जप्त
शहरातील मिरमिटा परिसरात ऐन सणासुदीच्या दिवसात भेसळयुक्त बर्फी तयार करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या अधिकाऱ्यांतर्फे छापा टाकून तब्बल १२ लाख रुपयांचा माल पकडण्यात आला
छत्रपती संभाजीनगर | 21 ऑक्टोबर 2023 : सध्या सणासुदीचे वातावरण सुरू आहे. नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात पार पडत असून काही दिवसांतच दिवाळीचे वेध लागतील. सणा-सुदीच्या काळात घरात गोडधोड केले जाते तसेच बऱ्याच वेळा बाहेरूनही मिठाई आणली जाते. गोड खायला तर सर्वांनाच आवडतं, लहानांपासून-मोठ्यापर्यंत, वृद्धांनाही मिठाईचा आस्वाद घ्यायला आवडतो. मात्र याच काळात मिठाईत भेसळ होण्याचीही शक्यता असते.
भेसळयुक्त मिठाई खाल्ल्याने पोट बिघडू शकते, तब्येतीवरही परिणाम होऊ शकतो. हेच लक्षात घेऊन संबंधित अधिकाऱ्यांकडून वेळोवेळी तपासणी केली जाते. अशीच एक कारवाई छत्रपती संभाजीनगर येथेही करण्यात आली आहे. शहरातील मिरमिटा परिसरात ऐन सणासुदीच्या दिवसात भेसळयुक्त बर्फी तयार करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या अधिकाऱ्यांतर्फे छापा टाकून तब्बल १२ लाख रुपयांचा माल पकडण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी कारवाई करत ५९८ किलो भेसळयुक्त बर्फी आणि ती तयार करण्याची पावडर जप्त केली आहे.
अधिकाऱ्यांकडून मोठी कारवाई, 12 लाखांचा माल जप्त
सध्या सर्वत्र सणाचे वातावरण आहे. त्यामुळे मिठाईला मोठी मागणी आहे. मात्र हीच गोष्ट हेरून अधिक नफा कमावण्याच्या उद्देशाने शहरातील मिटमिटा भागात काही लोक बनावट खवा आणि अन्नपदार्थ तयार करीत आहेत अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उस्मानिया कॉलनी, गट क्रमांक १२९ मधील प्लॉट क्रमांक ६८ येथे छापा टाकला.
या ठिकाणी गिरन बच्चन लालसिंग (वय ३८, रा. कैलासनगर), शिवसिंग रामदाससिंग (४२), विनोद शामसिंग मावर (१९, रा. सदर), सुभाष कल्याणसिंग मावर (१९), आदील मलीक रफीक (१९), सूरजकुमार जगदीशकुमार (२४), सत्यभान शंकरलाल (२३), परशुराम रामलाल (३२) आणि इतर दोन अल्पवयीन कामगार (सर्व रा. उस्मानिया कॉलनी, मिटमिटा) हे भेसळयुक्त बर्फी तयार करत होते त्यांना पोलिसांनी ताब्यात घेण्यात आली. तेथून एकूण १२ लाख ८७ माल हजार ४०४ रुपयांचा माल पकडला अधिकाऱ्यांनी ५९८ किलो भेसळयुक्त बर्फी आणि ती तयार करण्याची पावडर जप्त केली. याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.