मुंबई : हरयाणातील सोनीपतमधील नाथुपूर या गावात माहेरी आलेल्या नवविवाहीत महिलेला धक्कादायक प्रकार घडला. यामुळे संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली आहे. पतीने सरप्राईस गिफ्ट देण्याच्या बहाण्याने तिला घराबाहेर बोलवलं आणि शेतात नेलं. आसपास कोणीही नसल्याचं पाहून संधीचा फायदा घेत तिच्या गळ्यावर चाकुने वार केले. या हल्ल्यात नवविवाहीत महिला गंभीर जखमी झाली आहे. जखमी तरुणी आणि हल्लेखोर पती या दोघांचं 17 दिवसांपूर्वी लग्न झालं होतं आणि आठवडाभरापूर्वी ती सारसहून तिच्या माहेरी आली होती. गंभीर अवस्थेत असलेल्या महिलेला सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
पोलिसांनी सांगितलं की, आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पीडितेचं लग्न 18 फेब्रुवारीला लिवान गावातील गौरवसोबत झालं होतं. त्यानंतर 17 दिवसांनी पीडित तरुणी माहेरी नाथुपूरमध्ये आली होती. घटनेच्या दिवशी पती गौरवने तिला फोन केला आणि भेटण्यास बोलवलं. जेव्हा ती बाहेर आली तेव्हा गौरव तिला बाइकवर घेऊन गेला. बारोटा रोडवरील शेतात घेऊन गेला आणि चाकुने वार केले.
पीडितेने आरडाओरड केल्यानंतर तो तेथून पळून गेला. तिने कसंबसं करून घर गाठलं. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
रुग्णालयात उपचार घेत असलेल्या पीडितेने सांगितलं की, गौरवने कॉल करून बोलवलं. गिफ्ट देण्याच्या बहाण्याने शेतात घेऊन गेला आणि सरप्राईस गिफ्ट असल्याचं सांगितलं. तसेच डोळे बंद करण्यास सांगितलं. तेव्हा गौरवने चाकु काढून गळ्यावर वार केले आणि बाइकने पळून गेला.
पोलीस अधीक्षक बिजेंद्र कुमार यांनी सांगितलं की, पीडितेने जबाबवरून गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. लवकरच आरोपीला अटक केली जाईल. हल्ल्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.