आधी ईडी, मग सीबीआय, आता इन्कम टॅक्सकडूनही अनिल देशमुखांवर धाडी!
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर पुन्हा एकदा छापेमारी करण्यात आली आहे. सकाळी 11.30 वाजता आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही छापेमारी केली.
नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर पुन्हा एकदा छापेमारी करण्यात आली आहे. सकाळी 11.30 वाजता आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही छापेमारी केली. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर, मुंबई, तसंच त्यांच्या मालकीच्या कॉलेजवर आयकर विभागाने छापे ठाकले. नागपुरातील निवासस्थान, नागपूर जिल्ह्यातील काटोल येथील निवासस्थान, मुंबईतील ज्ञानेश्वरी निवासस्थान, NIT कॉलेजवर आयकर विभागाने छापा टाकून झाडाझडती केली.
अनिल देशमुख सध्या नागपुरात नाहीत. यापूर्वी दोन वेळा ईडी आणि सीबीआयने धाडी टाकल्या होत्या. आता दिल्ली आणि मुंबई येथील आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाडी टाकून चौकशी सुरु केली आहे.
देशमुखांशी संबंधित ठिकाणी टाकलेल्या धाडी
पहिली धाड: 25 मे 2021
25 मे 2021 रोजी ईडीने सर्वात पहिली धाड टाकली होती. नागपूर येथील शंकर नगर, छावणी भाग आणि जाफर नगर या ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या होत्या. त्यानंतर शिवाजी नगर भागातील हरेकृष्ण अपार्टमेंटमध्ये धाड टाकण्यात आली होती. ही कारवाई प्रामुख्याने सागर भटेवार यांच्याशी संबंधित ठिकाणी करण्यात आली होती. सागर भतेवार हे अनिल देशमुख यांच्या निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात.
दुसरी धाड: 25 जून 2021
या दिवशी ईडीने आठ ठिकाणी टाकल्या होत्या. या धाडी थेट अनिल देशमुख यांच्यावर होत्या. अनिल देशमुख यांचं वरळी सुखदा इमारतीतील घर, ज्ञानेश्वरी बंगला त्याच प्रमाणे त्यांच्या एका कार्यलयावर धाड टाकण्यात आली होती. त्यानंतर त्यांचे सेक्रेटरी संजीव पालांडे, कुंदन शिंदे यांच्याशी संबंधित ठिकाणीही धाडी टाकण्यात आल्या होत्या. याच कारवाईत पालांडे आणि कुंदन शिंदे यांना अटक करण्यात आली होती. या कारवाईवेळी देशमुख यांचा जबाब नोंदवण्यात आला होता.
तिसरी कारवाई: 2 जुलै 2021
2 जुलै रोजी ईडीने तिसऱ्यांदा अॅक्शन घेतली. अनिल देशमुख यांना समन्स देण्यासाठी ईडीचे अधिकारी त्यांच्या घरी गेले होते. मात्र, त्या दिवशी देशमुख सापडले नाहीत.
चौथी कारवाई: 6 ऑगस्ट 2021
6 ऑगस्ट रोजी ईडीने चौथ्यांदा कारवाई केली. ईडीने देशमुख यांच्या ट्रस्ट कार्यलयासह इतर दोन ठिकाणी आज कारवाई केली आहे.
पाचवी धाड – 17 सप्टेंबर 2021
अनिल देशमुख यांच्या घर-कार्यालयांवर आता आयकर विभागाने धाडी टाकल्या. अनिल देशमुख यांच्या नागपूर, मुंबई, तसंच त्यांच्या मालकीच्या कॉलेजवर आयकर विभागाने छापे ठाकले.
देशमुखांना आतापर्यंत चार समन्स
पहिलं समन्स 25 जून रोजी दुसरं समन्स 26 जून रोजी तिसरं समन्स 5 जुलै रोजी चौथ समन्स 2 ऑगस्ट रोजी
काय आहे प्रकरण?
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गंभीर आरोप केले होते. त्या पत्रानुसार निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे हे क्राईम इंटिलिजन्सचं यूनिट हेड करत होते. गेल्या काही महिन्यात गृहमंत्री अनिल देशमुखांना कित्येक वेळेस वाझेंना त्यांच्या ज्ञानेश्वर या निवासस्थानी बोलवलं आणि दर महिन्याला 100 कोटी रुपये जमा करायला सांगितलं. देशमुख वाझेंना म्हणाले की, मुंबईत 1750 बार आणि रेस्टॉरंट आहेत आणि त्यातल्या प्रत्येकाकडून 2 ते 3 लाख रुपये कलेक्ट केले तरीसुद्धा महिन्याला 40 ते 50 कोटी रुपये सहज उपलब्ध होतील. राहिलेली इतर रक्कम इतर मार्गांनी जमा करता येईल. देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या निवसस्थानी बोलवायचे. पोलिसांना ते सातत्याने सूचना द्यायचे. मला किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात देऊन देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या बंगल्यावर बोलवायचे आणि पैसे गोळा करण्यासाठी टार्गेट द्यायचे. टार्गेटनुससार ते पोलीस अधिकाऱ्यांना कार्यालयीन कामकाजात तसेच आर्थिक व्यवहारात सल्ला आणि निर्देश द्यायचे. पैसे गोळा करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचा ते उपयोग करायचे. त्यांचे हे भ्रष्ट आचरण अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या नजरेस आले होते, आदी आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुखांवर केले होते. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्रं लिहून हे आरोप केले होते.
संबंधित बातम्या :
Anil Deshmukh | माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवरील आरोपांचा ईडी तपास सुरु, ECIR दाखल
ईडीचा पुन्हा दणका; अनिल देशमुखांशी संबंधित तीन ठिकाणांवर धाडी!