एजंटची चलाखी समोर आल्यानं बँक कर्मचाऱ्यांच्या पायाखालची वाळू सारखली, एजंटचा फंडा आहे तरी काय?
कर्ज देतांना बहुतांश वेळेला खातरजमा करणाऱ्या बँक अधिकाऱ्यांच्या लक्षात हा प्रकार न आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
नाशिक : काही हजार रुपयांचे कर्ज घ्यायचे असले तरी बँक अनेक प्रकारची तपासणी करत असतात. बँकेचे कर्मचारी खातरजमा करत असतात. त्यामुळे खोटी कर्ज मिळणं अशक्यच आहे. असा समज सर्वसामान्य नागरिकांचा असतो. मात्र, असं नाही. नाशिकमध्ये जे काही समोर आलं आहे त्यावरून बँकेचे कर्मचाऱ्यांच्या पायाखालची वाळूच सरकली आहे. नाशिकच्या मायको सर्कल येथे आयडीएफसी फर्स्टची शाखा आहे. याच शाखेतून बँक एजंटसह कर्जदार यांनी बँकेला चुना लावल्याचे समोर आले आहे. बँक अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरुन मुंबई नाका पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्ज फसवणुकीच्या प्रकरणी बँकेने संशयित आरोपी असलेल्या एजंटसह सात कर्जदारांचे पितळ उघड केले आहे. बँकेतील खोट्या कर्ज प्रकरणाची माहिती बँकेच्या वर्तुळात पसरल्याने खळबळ उडाली आहे.
कर्ज देतांना बहुतांश वेळेला खातरजमा करणाऱ्या बँक अधिकाऱ्यांच्या लक्षात हा प्रकार न आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या खोट्या कर्जाचा प्रकार लक्षात आल्याने त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला आहे.
बँकेच्या व्यवहाराचे खोटे स्टेटमेंट देऊन एजंटने सात जणांच्या नावावर कर्ज घेतले आहे. बनावट कागदपत्रे घेऊन बँकेलाच गंडा घातल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
एजंटच्या चलाखीत खोटी कर्ज घेतलेल्या कर्जदारांच्याही हे प्रकरण चांगलेच अंगलट येणार आहे. पोलीस संशयित आरोपींचा शोध घेत आहे.
बँकेचे अधिकारी प्रमोदकुमार ओमकारेश्वर अमेटा यांच्या तक्रारीवरुन मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बँकेचा अधिकृत एजंट असलेल्या योगेश नाना पाटील याच्यासह गणेश सांगळे, सूर्यकांत वाघुळे, ताई पगारे, योगेश काकड, सुरेखा गायकवाड, नंदू काळे आणि स्वाती शिरसाठ यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
या सात जणांनी बॅंकेतून 54 लाखांचे कर्ज घेतले होते, त्यात एजंटने स्वतःच्या खात्यात नंतर रक्कम वर्ग केल्यानं ही घटना उघडकीस आली आहे.