5 वेळा चपलेने हाणा, 15000 रुपये घ्या… बलात्कार प्रकरण मिटवण्यासाठी पंचायतीत धक्कादायक शिक्षा
आग्रा येथून अजब प्रकरण समोर आलं आहे. बलात्कार प्रकरणातील आरोपील फक्त चपलांनी पाच फटके मारण्यात आले. आणि शिक्षा म्हणून त्याला 15 हजारांचा दंडही ठोठावण्यात आला. हे फर्मान पंचायतीमधील एका कथित मौलानाने सुमावले.
उत्तर प्रदेशातील आग्रा येथून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तेथे एका अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपीला पंचायतीद्वारेच शिक्षा सुनावण्यात आली. चपलांनी मारलेले अवघे पाच फटके आणि 15 हजार रुपयांचा आर्थिक दंड, एवढीशी शिक्षा त्याला सुनावण्यात आली. पंचायतीमधील हा अजब निर्णय मौलानांनी सुनावला. त्यानंतर पीडित पक्षातील महिलेवे आरोपी मुलाला चपलेचे पाच फटके मारले. या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
अखेर याप्रकरणात पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित पक्षाकडून एक मुलगी गायब झाल्याची माहिती देण्यात आली होती, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. गल्लीतील एका मुलानेच तिला गायब केल्याचा आरोपही पीडित पक्षाने केला होता. मात्र त्यानंतर काही काळाने त्यांनी त्यांची तक्रार मागे घेतली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
घरातून गायब झाली अल्पवयीन मुलगी
मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण आग्रा येथील शाहगंज क्षेत्रातील आहे. तेथील एक अल्पवयीन मुलगी घरातून निघून गेली होती. ही गोष्ट लक्षात येताच घरच्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. गल्लीतील एका मुलानेच तिला पळवून नेल्याचा आरोपही तिच्या घरच्यांनी केला होता. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू करत मुलीचा शोधही सुरू केला. मात्र आता आम्हीच मुलीला शोधून काढू असे सांगत तिच्या घरच्यांनी पोलिसांत दाखल केलेली तक्रार मागे घेतली.
पंचायतीने सुनावला निर्णय
त्यानंतर ताही वेळातच त्या मुलीला शोधून काढण्यात आले. याप्रकरणी त्या गल्लीतील एका घरातच पंचायत भरली आणि निर्णय देण्यासाठी एक कथित मौलाना हजर होते. त्यांनी आरोपी पक्षातील मुलगा आणि पीडित पक्ष, दोघांचीही बाजू ऐकून घेतली. मात्र त्या मुलाने आपल्याला गोड बोलून फसवून बळवून नेलं आणि गुंगीचं औषध असलेला पदार्थ खायला घालून आपल्यावर अत्याचार केला, असा आरोप पीडित मुलीने लावला आहे.
आरोपीला मारले पाच फटके
त्यावेळी अनेक आरोप-प्रत्यारोप करण्यात आले, अखेर दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर मौलानांनी त्यांचा निर्णय सुनावला. त्यांनी आरोपीला चपलेने पाच फटके मारण्याची शिक्षा सुनावली. तसेच त्याला 15 हजार रुपयांचा आर्थिक दंडही ठोठावला. त्यांचा हा निर्णय ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसला. अखेर पीडित पक्षातील महिलेने आरोपीला चपलेने पाच फटके मारले. या घटनेचा एक व्हिडीओदेखील व्हायरल दाला आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.