Ahmadnagar Crime : बुरखाधारी महिलांनी हातचलाखीने पळवले लाखोंचे दागिने,दिवाळीच्या मुहूर्तावर मोठा फटका

| Updated on: Nov 08, 2023 | 9:25 AM

शहरातील कल्याण ज्वेलर्स या दागिन्यांच्या दुकानामध्ये मोठी चोरी झाली आहे. दोन महिलांनी हातचलाखी करत लाखो रुपयांचे दागिने चोरून नेल्याचे उघड झाले.

Ahmadnagar Crime : बुरखाधारी महिलांनी हातचलाखीने पळवले लाखोंचे दागिने,दिवाळीच्या मुहूर्तावर मोठा फटका
Image Credit source: TV9 Network
Follow us on

कुणाल जायकर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, अहमदनगर | 8 नोव्हेंबर 2023 : दिवाळी सुरू होण्यास आत अवघा काहीच कालावधी उरला आहे. बाजारात उत्साहाचे वातवरण दिसत आहे. पणत्या, कंदील, रांगोळ्या, विविध रंग यांनी अवघा बाजार फुलून गेला आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कपड्यांच्या आणि मिठाईच्या खरदीसोबतच दागिन्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते.

यामुळे कपडे आणि दागिन्यांच्या दुकानात अभूतपूर्व गर्दी पहायला मिळते. मात्र याच गर्दीचा फायदा घेऊन काही चुकीचे प्रकारही घडू शकतात. गर्दीमध्ये हात मारणारे, हात चलाखी करून चोरी करणारे अनेक जण फिरत असतात. अशीच एक चोरीची घटना अहमदनगर शहरात घडल्याचे उघडकीस आले आहे. शहरातील कल्याण ज्वेलर्स या दागिन्यांच्या दुकानामध्ये मोठी चोरी झाली आहे. दोन महिलांनी हातचलाखी करत लाखो रुपयांचे दागिने चोरून नेल्याचे उघड झाले आहे. हा संपूर्ण प्रकार तेथील सीसीटीव्हीमध्ये देखील कैद झाला आहे. या चोरी संदर्भात तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्ही फुटेजचा तपास करून पोलिस त्या महिला चोरांचा शोध घेत आहेत.

अशी घडली चोरी

पोलिसांच्या सांगण्यानुसार, सहा नोव्हेंबर (सोमवार) रोजी चोरीचा हा प्रकार घडला. सहा तारखेला रात्री आठच्या सुमारास अहमदनगर शहरातील कल्याण ज्वेलर्समध्ये दोन बुरखाधारी महिला दागिने पाहण्यासाठी आल्या. त्यावेळी दुकानातील सेल्समन पूजा जगताप या त्या दोन महिलांना विविध दागिने दाखलत होत्या. खुर्चीवर बसलेल्या महिलांच्या समोर एका काऊंटरवर विविध दागिने ठेवण्यात आले होते आणि पूजा त्यांना त्या दागिन्यांची माहिती देत होत्या.

आणखी काही दागिने काढण्यासाठी पूजा यांची पाठ वळताच त्या दोन महिलांपैकी एकीने हातचलाखी करत तेथील काही दागिने लांबवले. चोरीची ही संपूर्ण घटना तेथील सीसीटीव्हीमध्ये कॅप्चर झाली. त्या निघून गेल्यानंतर काही दागिने गायब असल्याचे पूजा यांच्या लक्षात आले आणि त्यांनी दुकान मालकांना याबाबत कल्पना दिली. महिलांनी चोरलेल्या दागिन्यांची किंमत सुमारे तीन लाख रुपये इतकी आहे.

यानंतर पूजा जगताप यांनी तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये धाव घेत या चोरीसंदर्भात तक्रार नोंदवली. त्यानुसार पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ज्वेलर्स कपडे आणि इतर दुकानांमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी असते. त्यातच अशा प्रकारचे चोरीचे प्रकार वाढत असतात. गर्दीचा फायदा घेऊन चोरीच्या घटना वाढत असल्याने व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान तब्बल तीन लाख रुपये किमतीचे दागिने चोरीला गेल्याने सराफा बाजारात खळबळ उडाली आहे