चोरट्यांकडून मंदिर टार्गेट, हनुमान मंदिरावरील साडेतीन लाखांच्या कळसाची चोरी
चोरट्यांनी मंदिराचा कळस पळवल्याने लागरीक संतापले आहेत. याची दखल घेऊन पोलिसांनी चोरांना तात्काळ जेरबंद करावं, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
कुणाल जायकर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, अहमदनगर | 9 ऑक्टोबर 2023 : हनुमान मंदिरातील श्रीकृष्ण मूर्तीचा मुकूट चोरल्याप्रकरणी एका चोराला नाशिकमध्ये अटक करण्यात आल्याची घटना ताजीच आहे. त्याने देवाचे दर्शन घेऊन चोरट्याने हा मुकूट चोरल्याचे सीसीटीव्हीत कैद होते, अखेर त्याला अटक करण्यात आले. या घटनेला अवघे काही दिवस उलटत नाहीत तोच अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यात चोरट्यांनी मंदिराला पुन्हा टार्गेट केले आहे. पाथर्डी तालुक्यातील हनुमान टाकळी येथील हनुमान मंदिरावरील पंचधातूचे दोन कळस चोरीला गेल्याचे समोर आले आहे. त्याची किंमत लाखोंच्या घरात आहे.
शहरात सध्या चोरट्यांचा सुळसुळाट माजला आहे. त्यामुळे नागरिक आधीच जीव मुठीत धरून जगत आहेत. त्यातच आता चोरट्यांनी देवळांवरही नजर टाकल्याने नागरिक संतापले आहेत. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून आरोपींचा कसून शोध घेण्यात येत आहे.
साडेतीन लाखांचे कळस पळवले
अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातील हनुमान टाकळी येथे हनुमानाचे मंदिर आहे. त्याच मंदिरावरील पंचधातूचे दोन कळस चोरीला गेले आहेत. त्या दोन्ही कळसांची एकू किंमत साडेतीन लाख रुपयांच्या आसपास आहे. हनुमान टाकळी येथील श्री समर्थ हनुमान सेवा संस्थांचे ट्रस्टी अण्णासाहेब दगडखैर यांनी याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली.
रविवारी सकाळी अण्णासाहेब दगडखैर हे हनुमानाच्या मंदिरात दर्शनासाठी गेले होते. तेव्हा त्यांना मंदिरावर बसवलेल्या कळसांपैकी दोन पंचधातूचे कळस दिसले नाहीत. काही कामानिमित्त आपण मंदिरावरील कळस खाली काढले आहेत का, अशी विचारणा त्यांनी त्यांचे सहकारी रमेश महाराज यांच्याकडे केली. मात्र असे काहीच नसल्याचे रमेश यांनी स्पष्ट केले. त्यानंतर हा चोरट्यांचाच प्रताप असून, मंदिराचे कळस चोरीला गेल्याची त्यांची खात्री पटली. त्यांनी तत्काळ पोलिस स्टेशन गाठत या घटनेची माहिती दिली.
यामधील पंचधातूचा एक कळस हा 9 किलो वजनाचा आणि पाच फूट उंचीचा असून त्याची किंमत साधारण दोन लाख रुपये आहे. तर दुसरा कळस हा चार किलो वजनाचा आणि तीन फूट उंच असून त्याची किंमत दीड लाख रुपये असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. एकूण साडेतीन लाख रुपयांचे दोन कळस चोरीला गेले. याप्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. मात्र चोरट्यांनी देवांना, मंदिरांना टार्गेट केल्यानं नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. मागील काही दिवसापासून पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यातील मंदिरांना चोरट्यांकडून टार्गेट केलं जात आहे, त्यामुळे याची दखल घेऊन पोलिसांनी चोरांना तात्काळ जेरबंद करावं, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.