अहमदनगर : पोलिसांनी अहमदनगर जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यावर धडक कारवाई केलीय. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी ही मोहीम राबवली. या मोहीम अंतर्गत 90 ठिकाणी छापे टाकून झाडाझडती घेण्यात आली. यात 7 गावठी कट्टे, 8 जिवंत काडतुसे तसेच 3 तलवारी जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी 13 गुन्हेगार जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. या मोहिमे अंतर्गत नेवासा, राहुरी आणि श्रीरामपूर तालुक्यात शोध घेण्यात आला.
अहमदनगर पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. पोलीस पुढील कारवाई करत आहेत. विशेष म्हणजे आतापर्यंत पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी 27 गावठी कट्टे जप्त केले आहेत. तसेच 106 आरोपींना अटक केली आहे. या कारवायानंतर 36 गुन्हे दाखल करण्यात आलेत.
अहमदनगर जिल्ह्यामध्ये घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांमध्ये गुन्हेगारांकडून वारंवार गावठी कट्ट्याचा वापर होत होता. प्रामुख्याने जिल्ह्यातील नेवासा, श्रीरामपूर व राहूरी या तालुक्यामध्ये गावठी कट्टयांचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर होत आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी नगर जिल्ह्यामध्ये अग्निशस्त्रांचा वापर करून गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांची माहिती संकलित केली. यानंतर कारवाई करण्याबाबतच्या सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे श्रीरामपूर, नेवासा व राहुरी तालुक्यातील 81 सराईत गुन्हेगारांची माहिती संकलित केली.
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशानुसार अपर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक दिपाली काळे, श्रीरामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे व नियंत्रण कक्ष तथा पोलीस उपअधिक्षक मुख्यालयाचे पोलीस निरिक्षक बाजीराव पोवार यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक अनिल कटके यांनी ही कारवाई केली.
त्यांच्यासोबत पोलीस निरिक्षक रणजित डेरे, पोलीस निरिक्षक मसूद खान, पोलीस निरिक्षक विजय करे, पोलीस निरिक्षक संजय सानप, पोलीस निरिक्षक नंदकुमार दुधाळ, सहाय्यक पोलीस निरिक्षक सोमनाथ दिवटे, सहाय्यक पोलीस निरिक्षक रामचंद्र करपे, सहाय्यक पोलीस निरिक्षक सचिन बागूल, पोसई गणेश इंगळे आदींसह जिल्ह्यातील 25 पोलीस उपनिरीक्षक आणि 350 पोलीस अमलदार यांचा या कारवाईत सहभाग होता. या पोलीस कर्मचाऱ्यांनी वेगवेगळ्या पथकांनी ही कारवाई केली.
Ahmednagar Police action on illegal weapons in district