मोठी बातमी! मुस्लिम मुलीशी विवाह केला म्हणूनच दीपक बर्डे याची हत्या? अटकेतील आरोपींकडून हत्येची कबुली
Deepak Barde Murder Case : दीपक बर्डे हा अहमदनगरच्या श्रीरामपूर तालुक्यातील एक तरुण होता. तो गेल्या 12 ते 13 दिवसापासून बेपत्ता होता. त्याच्या बेपत्ता होण्यामागे घातपाताचा संधय व्यक्त केला जात होता. दीपक बर्डे यांच्या वडिलांनी मुलाचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केल्यानंतर श्रीरामपूर तालुक्यातील पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला होता.
अहमदनगर : बेपत्ता दीपक बर्डे (Deepak Barde) या तरुणाच्या अपहरणप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. श्रीरामपूर तालुक्यातील भोकर (Bhokar, Shrirampur) येथील अपहरण झालेल्या तरुणाचा खून (Ahmednagar Murder News) केल्याची कबुली अटकेतील आरोपीने दिली आहे. दीपक बर्डे प्रकरणातला हा सगळ्यात मोठा खुलासा मानला जातोय. महत्त्वाचं म्हणजे मुस्लिम मुलीशी विवाह केला म्हणूनच दीपक बर्डे या तरुणाचा खून केला का? याबाबत मात्र अद्याप कोणतीही स्पष्टता तपासातून समोर आलेली नाही. मात्र मुस्लिम मुलीसोबत त्याचे प्रेमसंबंध होते, या गोष्टीला पोलिसांनीही दुजोरा दिला आहे. दरम्यान दीपक बर्डे या तरुणाचा मृतदेह अद्याप मिळू शकलेला नाही. दीपकाच मृतदेह शोधण्याचं आव्हान सध्या पोलिसांपुढे उभं ठाकलंय. दीपक बर्डे याचा मृतदेह गोदावरी नदीच्या आरोपींनी फेकला असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. त्यानुसार आता नदी पात्रात मृतदेह शोधण्याचे काम पोलिसांकडून युद्ध पातळीवर सुरू आहे. त्यासाठी एनडीआरएफची देखील मदत घेतली जाते आहे.
कोण आहे दीपक बर्डे?
दीपक बर्डे हा अहमदनगरच्या श्रीरामपूर तालुक्यातील एक तरुण होता. तो गेल्या 12 ते 13 दिवसांपासून बेपत्ता होता. त्याच्या बेपत्ता होण्यामागे घातपाताचा संशय व्यक्त केला जात होता. दीपक बर्डे यांच्या वडिलांनी मुलाचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केल्यानंतर श्रीरामपूर तालुक्यातील पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला होता. 31 ऑगस्ट रोजी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करत सर्व आरोपींना अटकही करण्यात आली होती.
या प्रकरणातील आरोपींना अगोदर सात दिवस पोलीस कोठडी मिळाली. नंतर 13 तारखेपर्यंत पुन्हा न्यायालयाने पोलीस कोठडी दिल्यानंतर आरोपींनी दीपकचा खून केल्याची कबुली दिली आहे. अप्पर पोलिस अधिक्षक स्वाती भोर यांनी याप्रकरणाची माहिती दिली आहे. हत्येचं कारण नेमकं काय होतं, याचा उलगडा पोलीस आता केव्हा करतात, याकडेही संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
दीपक बर्डेचे राजकीय पडसाद
दीपक बेपत्ता झाल्यानंतंर त्याचे राजकीय पडसादही उमटले होते. नितेश राणे यांनी श्रीरामपुरात मोर्चा काढला होता. भाजप आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्त्वाखाली श्रीरामपुरात भव्य जनआक्रोश यात्रा काढण्यात आली होती. या यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसादही मिळाला होता. या जनआक्रोश यात्रेच्या काही दिवसांनंतर दीपक बर्डे बाबत मोठा खुलासा करण्यात आला आहे. दरम्यान, आता आरोपींनी दीपकच्या खून केला असल्याची कबुलीही दिली. असं असलं तरी अद्याप दीपकचा मृतदेह सापडलेला नाही. त्यामुळे पोलिसांसमोरची आव्हानंही वाढलेली आहेत.