Akshay Shinde Encounter : मोठी अपडेट ! अक्षयचं एन्काऊंटर कुठे झालं? फॉरेन्सिक टीमला पोलीस व्हॅनमध्ये काय सापडलं?
बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा काल पोलिसांनी एन्काऊंटर केला. त्यात त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर बदलापूर येथील महिलांनी रेल्वे स्थानकाबाहेर जमून मोठा जल्लोष केला आहे. फटाके फोडून आनंद व्यक्त करतानाच पोलिसांचे आभारही मानले आहे. तर फॉरेन्सिक टीमने आज सकाळी पोलीस व्हॅनची तपासणी करून महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत.
बदलापूरमधील चिमूरड्यांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करण्यात आला आहे. पोलिसांवर त्याने आधी हल्ला केला. त्यामुळे पोलिसांनी बचावासाठी केलेल्या हल्ल्यात अक्षयचा मृत्यू झाला आहे. काल पहाटे ही घटना घडली. आज याबाबतची आणखी एक अपडेट आली आहे. अक्षयचा एन्काऊंटर पोलीस व्हॅनमध्येच झाल्याचं स्पष्ट झालं आहे. फॉरेन्सिक लॅबच्या टीमने आज या व्हॅनची पाहणी केली. त्यावेळी व्हॅनमध्ये पोलिसांना बंदुकीच्या पुंगळ्या आढळून आल्या आहेत.
अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्यानंतर आज फॉरेन्सिक टीमने पोलीस व्हॅनची तपासणी केली. यावेळी फॉरेन्सिक टीमला व्हॅनमध्ये बंदुकीच्या पुंगळ्या सापडल्या आहेत. फॉरेन्सिक लॅबला एकूण चार गोळ्या सापडल्या आहेत. यातील तीन गोळ्या अक्षय शिंदेने झाडल्या होत्या. तर एक गोळी पीआय संजय शिंदे यांनी झाडली होती. या गोळ्यांचा रिकाम्या पुंगळ्या फॉरेन्सिक टीमला सापडल्या. फॉरेन्सिक टीमने पोलीस व्हॅनमधून रक्ताचे नमुने घेतले आहेत. दोन वेगवेगळ्या जागेवरून रक्ताचे नमुने फॉरेन्सिक टीमने ताब्यात घेतले आहेत. यावरून हा ही घटना पोलीस व्हॅनमध्येच झाल्याचं स्पष्ट होत आहे.
महिलांचा फटाके वाजवून जल्लोष
दरम्यान, अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्याने बदलापूरमधील महिलांनी बदलापूर स्थानकाबाहेर फटाके वाजवून जल्लोष केला. आज एका नराधमाचा अंत झाला याचा आम्हाला आनंद आहे. आता भविष्यात अशा घटना कमी होतील, अशी आशा आहे, असं या महिलांनी म्हटलं आहे. तसेच महिलांच्या आंदोलनाला यश मिळालं आहे. आम्ही पोलिसांचे आभार मानतो, असंही या महिलांनी म्हटलं आहे.
आमदाराने फटकारले
तर आमदार विश्वनाथ भोईर यांनी या प्रकरणी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य करणाऱ्या अक्षय शिंदे या नराधमाच्या एन्काऊंटरप्रकरणी विरोधकांनी थोडेतरी तारतम्य बाळगले पाहिजे, अशा शब्दांत कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी विरोधकांना खडेबोल सुनावले आहेत. बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीने पोलिसांची बंदूक हिसकावून त्यांच्यावरच गोळीबार केला. त्यावेळी स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे मारला गेला असून या प्रकरणी विरोधकांनी राज्य सरकारला संशयाच्या भोवऱ्यात उभे केले आहे. त्यावर आमदार विश्वनाथ भोईर यांनी विरोधकांना चांगलेच धारेवर धरत हे बोल सुनावले आहेत.
बदलापूरमधील चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली होती. त्यावेळी सामान्य नागरिकांसह राज्यातील विरोधी पक्षाचे नेतेही या नराधमाला फाशी देण्याची मागणी करत होते. आणि आज अक्षय शिंदे हा पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात मारला गेल्यानंतर हेच विरोधक राज्यसरकार आणि पोलिसांना आरोपीच्या पिंजऱ्यात कसे काय उभे करत आहेत? असा संतप्त सवाल भोईर यांनी विचारला आहे.