प्रेमासाठी वाट्टेल ते! तिने त्याला पाठवले तब्बल 1,59,000 मेसेज, त्यांनी घेतला असा निर्णय की…
डेटिंग ॲपच्या माध्यमातून तिची एका व्यक्तीची भेट झाली. दोघांचे बोलणे झाले. त्यांनी भेटण्याचे ठरवले. त्यानंतर प्रेयसीने जे केले ते फारच धक्कादायक होते. तिने त्याला तब्बल 1,59,000 मेसेज पाठवले. तिचे मेसज पाहून त्याने...
न्यूयॉर्क | 24 फेब्रुवारी 2024 : प्रेम आंधळं असतं असं म्हणतात. बरोबर, योग्य, अयोग्य, चांगलं, वाईट असं काही प्रेमात पाहत नाही. अशावेळी प्रेमात केलेली कोणतीही कृती कधी योग्य असते तर कधी चुकीच्या पलीकडे गेलेली असते. पण, अमेरिकेतील ॲरिझोना येथील एका महिलेने प्रेमासाठी असे काही केले की ज्यामुळे तिचा प्रियकर घाबरला. ती त्याच्या इतक्या प्रेमात पडली की आपण काय करतोय याचे भानही तिला राहिलं नाही. शेवटी तिचं हातून ती चूक घडलीच आणि तिला जेलमध्ये जावं लागलं. त्या प्रेयसीने तिच्या प्रियकराला तब्बल 1 लाख 59 हजार मेसज पाठवले. मेसेज पाठवणे हा तिचा गुन्हा नव्हता. पण प्रेमासाठी तिने जे काही केलं तो तिचा गुन्हा ठरला. असं काय केल होतं तिने?
ॲरिझोना शहरात राहणाऱ्या 31 वर्षीय जैकलीन एडीज हिची डेटिंग ॲपच्या माध्यमातून एका तरुणासोबत ओळख झाली. त्यांनी पुढे जाण्याचे ठरवले. दोघांचे बोलणे पुढे सरकल्याने भेटीची त्यांनी वेळ ठरविली. पहिल्याच भेटीत जैकलीन हिचे त्या तरुणावर प्रेम जडले. त्या भेटून ती घरी पोहोचली. घरी पोहोचताच तिने डेटिंग ॲपवर प्रियकराला मेसेज करायला सुरुवात केली.
पहिल्या दिवशी तिने प्रियकराला 500 मेसेज पाठविले. इतके मेसेज पाहून तो तरुण भांबावला. त्याला कळून चुकले की जैकलीन सोबत तो जास्त काळ राहू शकणार नाही. त्याने तिला स्पष्ट नकार कळविला. पण, जैकलीनने त्याची पाठ सोडली नाही. तो रोज त्याला मेसेज करू लागली. 10 महिन्यांमध्ये तिने त्याला तब्बल 1 लाख 59 हजार मेसेज पाठवले.
जैकलीन हिच्या मेसेजला कंटाळून त्या तरुणाने पोलिसांमध्ये तक्रार केली होती. पोलिसांनी तिला समज दिली. मात्र, याचा राग येऊन तिने ब्लॉक केले तर थर करेन अशी धमकी दिली. त्यानंतरही ती लग्नासाठी त्याला गळ घालू लागली. मेसेजमध्ये जीवे मारण्याची धमकी द्यायची. कधी कधी आक्षेपार्ह बोलायला लागली. यामुळे तरुण अधिकच घाबरला.
जैकलीन ही ॲरिझोनामध्ये रहात होती. पण, तो तरुण फ्लोरिडा येथे रहात होता. त्यामुळे तिनेही फ्लोरिडा येथे त्या तरुणाच्या घराजवळ नवीन घर घेतले. तो मेसेजला उत्तर देत नव्हता हे पाहून तिने एके दिवशी त्याच्या घराच्या खिडकीमधून घरात प्रवेश केला आणि त्याच्या बाथटबमध्ये आंघोळ करू लागली. तिच्या त्या कृतीने घाबरून त्याने पुन्हा पोलिसात धाव घेतली.
पोलिसांनी जैकलीन हिला अटक केली. तिची वैद्यकीय तपासणी केली असता तिला मानसिक आजार असल्याचे समोर आले. पोलिसांना तिच्या कारमध्ये एक मोठा चाकूही सापडला. तिला याचे कारण विचारल्यावर ती म्हणाली, ‘प्रेमात खूप काही करावे लागते.’ वैद्यकीय तपासणीनंतर पोलिसांनी तिला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले.