पश्चिम महाराष्ट्रात कोट्यवधींच्या शेअर मार्केट घोटाळ्याचा आरोप; तक्रारीत ‘या’ तीन जिल्ह्यांची नावे
पैसे दुप्पट होतील या अपेक्षेने लोक पैसे गुंतवण्यासाठी पुढे येतात. त्याचा गैरफायदा घेऊन लोकांना लुटले जात आहे, असेही नितीन चौगुले यांनी ईडीकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
सांगली / शंकर देवकुळे (प्रतिनिधी) : राज्यात सध्या ईडीच्या कारवाया वाढल्या आहेत. त्यावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. याचदरम्यान पश्चिम महाराष्ट्रात मोठी खळबळ उडवून देणारा आरोप (Allegation) करण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यांत कोट्यवधींचा शेअर मार्केट घोटाळा (Share Market Scam) घडल्याचा आरोप श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे अध्यक्ष नितीन चौगुले (Nitin Chawgule) यांनी केला आहे. त्यांनी यासंदर्भात अंमलबजावणी संचालनालयाकडे (ईडी) रितसर तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे कथित घोटाळ्यात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभागी असलेल्या घोटाळेखोरांचे धाबे दणाणले आहेत.
पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून लूट
घोटाळेखोरांनी मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्य लोकांची फसवणूक केल्याचा दावा नितीन चौगुले यांनी केला आहे. अनेक लोकांना कोरोना महामारीचा मोठा फटका बसला आहे. अशा लोकांची आर्थिक गरज लक्षात घेऊन त्यांना पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवले जात आहे.
पैसे दुप्पट होतील या अपेक्षेने लोक पैसे गुंतवण्यासाठी पुढे येतात. त्याचा गैरफायदा घेऊन लोकांना लुटले जात आहे, असेही नितीन चौगुले यांनी ईडीकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
दोन कंपन्यांच्या संचालकांना अटक
पश्चिम महाराष्ट्रात शेअर मार्केटच्या नावाखाली पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवले जाते व लोकांना लुटले जाते. यासाठी बोगस कंपन्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या माध्यमातून कोट्यवधी रुपये हडपून कंपन्यांचे संचालक गायब झाले आहेत.
या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर दोन कंपन्यांच्या संचालकांना अटक झाली आहे, अशी माहिती नितीन चौगुले यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.
3 हजार कोटींहून अधिक रक्कमेचा घोटाळा
शेअर मार्केट घोटाळ्याची पाळेमुळे सांगली, सातारा आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यांत पसरली आहेत. या घोटाळ्यात तब्बल 3 हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कमेचा अपहार झाला आहे, असा आरोप नितीन चौगुले यांनी केला आहे.
यासंदर्भात शेअर मार्केटमधील बोगस कंपन्यांची पाळेमुळे खणून काढण्यासाठी चौगुले यांनी मुंबईतील ईडी कार्यालयात तक्रार दाखल केली आहे.
बोगस कंपन्यांवर कारवाईची मागणी
कथित शेअर मार्केट घोटाळ्यातील बोगस कंपन्यांचे सर्व व्यवहार तपासून संबंधित कंपन्यांवर कारवाई करावी, तसेच कंपन्यांवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणीही नितीन चौगुले यांनी केली आहे.
आपल्या तक्रारीची शहानिशा करून ईडीच्या झोनल डायरेक्टरनी तात्काळ तीनही जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांना पत्र पाठवून माहिती घेणार असल्याचे आश्वासन दिले, असे श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे अध्यक्ष नितीन चौगुले यांनी सांगितले.