”ही पिस्तुल तुमचीच आहे का? असेल तर ओळख दाखवून घेऊन जा” असा मेसेज जेव्हा ग्रुपवर पडतो
पुणे जिल्हातील पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याचे हे पिस्तुल असल्याचे समोर आले आहे. पिस्तुल विसरलेल्या त्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव मात्र गुपीत ठेवण्यात आले आहे.
माढा : माढा तालुक्यातील टेभुर्णी शहरानजीक असलेल्या जंगदबा कॉटेज या हॉटेल (Hotel)मध्ये आलेला पोलीस अधिकारी (Police Officer) स्वतःची पिस्तुल (नंबर. पी. आर. 238) विसरला. पोलीस अधिकाऱ्यांना स्वत:च्या पिस्तुलची देखील आठवण राहत नाही का ? असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे. यावरुन सदर अधिकाऱ्याचा बेफिकीरपणा देखील समोर आला आहे. हा प्रकार टेभुर्णी शहरातील हद्दीत बुधवारी दुपारी घडला आहे. हे पिस्तुल (Pistol) टेभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी संबंधित अधिकाऱ्याच्या स्वाधीन केले आहे.
पुणे जिल्ह्यातील एपीआयची पिस्तुल असल्याचे निष्पन्न
पुणे जिल्हातील पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याचे हे पिस्तुल असल्याचे समोर आले आहे. पिस्तुल विसरलेल्या त्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव मात्र गुपीत ठेवण्यात आले आहे.
हॉटेलमध्ये फ्रेश होण्यासाठी गेले असता पिस्तुल विसरले
जगदंबा कॉटेज हॉटेलमध्ये आलेला तो अधिकारी वॉशरुममध्ये फ्रेश होण्यासाठी गेला होता. हॉटेलमधून ते गेल्यानंतर वॉशरुममध्ये पिस्तुल आढळल्याची माहिती मॅनेजर राहुल रसाळ यांनी टेभुर्णी पोलीस स्टेशनला तत्परतेने दिली. त्यानुसार टेभुर्णी पोलिसांनी पिस्तुल ताब्यात घेत पोलीस स्टेशनला आणले.
पोलिसांच्या ग्रुपवर मॅसेज पडल्यानंतर अधिकाऱ्याच्या आले लक्षात
पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या ग्रुपवर पिस्तुल कुणाची असल्यास घेऊन जावी, अशी पोस्ट टाकली. त्यानुसार काही तासातच त्या पोलीस अधिकाऱ्याला आपल्या कमरेल्या पिस्तुल नसल्याचे लक्षात आले.
ही पोस्ट पाहून त्या ए.पी.आय अधिकाऱ्याने टेभुर्णी पोलीस ठाण्यात येऊन पिस्तुल ताब्यात घेतली. या प्रकरणावरून एका जबाबदार पोलीस अधिकाऱ्याला आपल्या पिस्तुलचा विसर पडल्याचे समोर आले आहे. अधिकाऱ्यांनी आपल्या जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करता कामा नये. (An assistant police officer in Pune district apparently forgot his pistol in a hotel in Madha)