Gadhinglaj : गडहिंग्लजमध्ये पोलिस असल्याची बतावणी करून वृ्ध्द दाम्पत्याला लुटले, महिन्याभरातील दुसरी घटना
सुलोचना धाकोजी आणि त्यांचे पती दुंडाप्पा धाकोजी हे नातवाला दवाखान्यात घेऊन गेले होते. तेथे उपचार करुन पती-पत्नी दोघे घरी घाळी कॉलनीत परतत होते. त्यावेळी दोन तरुणांनी त्यांना हेरले.
कोल्हापूर – गडहिंग्लज (Gadhinglaj) शहरातील भडगाव (Bhadgaon) मार्गावरील घाळी कॉलनीमध्ये काल दुपारी चार वाजता आलेल्या तीन तरुणांनी वृध्द दाम्पत्याला पोलीस असल्याचं सांगितलं. त्याचबरोबर त्यांच्याकडील 4 लाख किंमतीच्या 9 तोळ्याच्या 6 सोन्याच्या बांगड्या घेऊन पोबारा केला आहे. ही घटना घडल्यापासून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. त्याचबरोबर पोलिसांना चोरट्यांना पकडण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. सुलोचना धाकोजी (रा. घाळी कॉलनी, गडहिंग्लज) असे फसवणूक झालेल्या वृध्द महिलेचे नाव आहे. गडहिंग्लज शहरात दोन महिन्यात अशाच प्रकारच्या घटनांची मालिका घडत असल्याने खळबळ उडाली आहे. मागच्या काही दिवसांपासून अशा प्रकारच्या घटना घडत असल्याने चोरटे तिथलेचं असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर तिथले सीसीटिव्ही (CCTV) पोलिस तपासून पाहत आहेत.
नेमकं काय घडलं
सुलोचना धाकोजी आणि त्यांचे पती दुंडाप्पा धाकोजी हे नातवाला दवाखान्यात घेऊन गेले होते. तेथे उपचार करुन पती-पत्नी दोघे घरी घाळी कॉलनीत परतत होते. त्यावेळी दोन तरुणांनी त्यांना हेरले. आम्ही पोलिस असून शहरात चोरी झाली आहे. या चोरीत सोने गेले असून याची तपासणी आम्ही करत आहोत असे त्यांनी वयोवृद्ध जोडप्याला सांगितले. सुलोचना यांनीही हातातील सहा सोन्याच्या बांगड्या त्यांच्या हातात दिल्या. चोरट्यांनी बांगड्या तपासण्याचे नाटक करत सुलोचना यांच्याकडून रुमाल घेवून हात चलाखी करत हातातील तीन कडे रुमालात घालून त्यांच्याकडे परत दिले. घरात जाऊन रुमाला सोडा असे म्हणत हे दोन तरुण अयोध्यानगरच्या दिशेने पसार झाले. घरात जाऊन सुलोचना यांनी रुमाल सोडल्यावर बनावट तीन कडे आणि दगड असल्याचे दिसून आले. फसवणूक झाल्याचे कळताच त्यांना धक्का बसला. गडहिंग्लज पोलीसात याची नोंद करण्यात आली असून पोलीसांनी या परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोरट्यांचा शोध घेत आहेत.
एकाचं महिन्यात दोन घटना घडल्यामुळे पोलिसांनी गस्त वाढवली
एकाच महिन्यात अशा पद्धतीच्या दोन घटना घडल्यामुळे पोलिसांनी गस्त वाढवली आहे. त्याचबरोबर संशयित तरुणांची चौकशी सुरु आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत. चोरटे तिथलेचं असावेत अशी पोलिसांना शंका आहे.