कल्याण : रस्त्यावर धूम्रपान (Smoking) करणाऱ्या वृद्ध इसमांना केडीएमसीचे अधिकारी असल्याची बतावणी करीत लुबाडत असलेल्या दोन भामट्यांपैकी एका भामट्याला डोंबिवली टिळकनगर पोलिसांनी सीसीटीव्ही (CCTV)च्या आधारे बेड्या ठोकल्या आहेत. सोमनाथ कांबळे असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या या भामट्याचे नाव आहे. आरोपी काही महिन्यांपूर्वी महापालिकेत कंत्राटी पद्धतीने स्वच्छता मार्शल म्हणून कार्यरत होता. मात्र कामावरून काढल्यानंतर आपल्या साथीदारासह झटपट पैसे मिळवण्यासाठी रस्त्यावर धूम्रपान करणाऱ्या वृद्ध इसमांना कारवाईची भीती दाखवत लुटायचा. दुसरा आरोपी फरार असून सध्या टिळकनगर पोलिस या घटनेचा शोध घेत आहेत.
ठाकुर्ली 90 फिट रोड परिसरात आम्ही पालिकेचे आधिकरी आहोत. आपण सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर धूम्रपान करत आहेत. आपल्याला 30 हजाराचा दंड भरावे लागेल, न्यायालयात जावे लागेल, असे सांगत वयोवृद्ध इसमाकडून पैसे घेऊन फरार होत असत. याप्रकरणी एका वयोवृद्ध इसमाने 30 हजार दंड सांगत तडजोड करत 7600 रुपये घेऊन दोन आरोपी फरार झाल्याची तक्रार डोंबिवली टिळकनगर पोलिसांत दिली होती. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजद्वारे तपास करत गोपनीय बातमीदाराद्वारे उल्हासनगर परिसरात सापळा रचून सोमनाथ कांबळे नावाच्या आरोपीला बेड्या ठोकल्या. आरोपीकडे कसून तपास केला असता, तो पालिकेत मार्शल म्हणून काम करत होता हे कळले. मात्र त्यानंतर झटपट पैसे मिळवण्यासाठी आपल्या एका मित्राच्या मदतीने मोटारसायकलवर हा गुन्हा केल्याची त्याने कबुल दिली. (An elderly smoker was robbed by pretending to be a municipal official in Kalyan)