सासूने सुनेला फोन लावला तर व्यस्त येत होता, मग सुनेने सासूला फोन लावला तर उचलत नव्हत्या, सायंकाळी सुनेनं येऊन पाहिलं तर…
मुलगा कामाला गेला होता, सून माहेरी गेली होती. वृद्ध महिला घरी एकटीच होती. सायंकाळी मोठी सून पहायला आली अन् धक्काच बसला.
नाशिक : जेष्ठ नागरिकांना घरी एकटे पाहून लुटणारी टोळी सक्रिय आहे. एकटे असल्याची संधी साधत घरात घुसून जेष्ठ नगारिकांना मारहाण करत किंवा त्यांची हत्या करत चोरी करण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. हल्ली पती-पत्नी दोघेही नोकरी करतात. त्यामुळे जेष्ठ नागरिक घरी एकटे असतात. हीच संधी साधत चोरटे आपला हेतू साधतात. अशी एक घटना नाशिकमध्ये उघडकीस आली आहे. घरी एकटी असलेल्या वृद्ध महिलेची हत्या करुन अंगावरील दागिने लुटून चोरट्याने पोबारा केला. सुरेखा बेलेकर असे मयत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंद केला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. आरोपीच्या शोधासाठी पोलीस परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेजही तपासत आहेत.
घरी मयत महिला एकटीच होती
जेलरोडवरील हनुमंत नगरमध्ये राहणाऱ्या सुरेखा बेलेकर यांचा मोठा मुलगा आणि सून वेगळे राहतात. सुरेखा या आपला छोटा मुलगा आणि सुनेसोबत राहत होत्या. रविवारी सुरेखा यांचा छोटा मुलगा दीपक कामावर गेला होता. तर भावाच्या लग्नासाठी सून माहेरी गेली होती. सुरेखा या घरी एकट्याच होत्या. त्यांनी आपल्या मोठ्या सुनेसोबत बोलण्यासाठी तिला फोन लावला. पण तिचा फोन व्यस्त येत होता. सुनेने सासूबाईंचा मिसकॉल्ड बघून त्यांना कॉल केला, मात्र बऱ्याचदा कॉल करुनही त्यांनी उचलला नाही. याबाबत सुनेनेही अधिक लक्ष दिले नाही.
दूधवाला आल्यानंतर घटना उघडकीस
सायंकाळी दूधवाला दूध देण्यासाठी घरी आला. बराच वेळ दरवाजा ठोकूनही त्या दरवाजा उघडत नव्हता. दूधवाल्याने त्यांच्या मोठ्या सुनेला ही बाब सांगितली. सुनेने आधी शेजाऱ्यांना फोन करुन सांगितले. शेजाऱ्यांनीही दरवाजा ठोकवून पाहिला. मात्र दरवाजा उघडला नाही. अखेर मोठी सून घरी आली. तरीही दरवाजा उघडला नाही. तिने तात्काळ पतीला आणि दिराला याची माहिती दिली.
यानंतर बेलेकर यांची मुलं तात्काळ घरी आली. त्यांनी घराच्या मागे जाऊन पाहिले असता मागचा दरवाजा उघडा होता. आत जाऊन पाहिले तर सर्वांनाच धक्का बसला. सुरेखा यांच्या मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता, तर त्यांच्या अंगावरील दागिने गायब होते. मात्र चोराने अंगावरी दागिन्यांव्यतिरिक्त घरातील इतर कोणत्याही मौल्यवान वस्तूला हात लावला नसल्याने हत्या नेमकी चोरीच्या उद्देशाने झाली की अन्य काही हेतूने झाली याबाबत पोलीस तपास करत आहेत.