सायबर क्राईमचा नवा फंडा… पोलिसांना प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेतील कुकलाच घातला गंडा…
ऑनलाईन गंडा घालण्याचा नवा फंडा आता हॅकर्सने शोधून काढला आहे. त्याला बळी पडला आहे, महाराष्ट्र पोलीस अकादमीतील एक कुक. साडेतीन लाखांचं कर्ज मंजूर करून देतो म्हणून तब्बल 1 लाख 93 हजार रुपयांना हॅकर्सने त्याला गंडवल आहे. याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात सायबर कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विविध हॅकर्सचा यामध्ये समावेश असल्याचं दिसून येत आहे.
नाशिक : ऑनलाईन गंडा घालण्याचा नवा फंडा आता हॅकर्सने शोधून काढला आहे. त्याला बळी पडला आहे, महाराष्ट्र पोलीस अकादमीतील ( MAHARASHTRA POLICE ) एक कुक. साडेतीन लाखांचं कर्ज ( LOAN )मंजूर करून देतो म्हणून तब्बल 1 लाख 93 हजार रुपयांना हॅकर्सने त्याला गंडवल आहे. याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात सायबर कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विविध हॅकर्सचा यामध्ये समावेश असल्याचं दिसून येत आहे. ज्या कुक सोबत हा प्रकार घडलाय तिथं राज्यातील पोलीस उपनिरीक्षक तुकडीला प्रशिक्षण दिलं जातं. त्यातीलच कर्मचारी सायबर गुन्ह्याला बळी पडल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
त्यामुळे अशा सायबर ( CYBER CRIME ) हॅकर्सच्या भूलथापांना बळी पडू नका असं आवाहन वारंवार करण्याची वेळ येत आहे. पोलिसांना ज्या ठिकाणी प्रशिक्षण दिले जाते त्या ठिकाणच्या एका कुकला फसविल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
सायबर गुन्हेगारांनी थेट पोलिसांनाच आव्हान दिल्याची चर्चा होऊ लागली आहे. एका नामांकित कंपनीचे लोन करून देतो म्हणून वेळोवेळी रवींद्र साळवे या कर्मचाऱ्याकडून फोन पे द्वारे पैसे आकारले जात होते.
कर्ज मंजुरीच्या नावाखाली साळवे ही विविध माध्यमांनी त्यांना पैसे देत राहिले. इतकंच काय तर कर्जमंजूर झाले आहे मात्र आरबीआयच्या नियमानुसार तुम्हाला काही रक्कम भरावी लागेल, प्रोसेसिंग फी लागेल म्हणून काही रक्कम भरावी लागेल.
अशी वेगवेगळी कारणे देऊन साळवे यांना जवळपास कर्ज मंजुरीच्या नावाखाली एक लाख 93 हजार रुपयांना एकूण आठ जणांनी गंडा घातला आहे. गंगापूर पोलिस ठाण्यात याबाबत एकूण आठ जणांवर सायबर कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस निरीक्षक रियाज शेख याबाबत तपास करत असून तातडीने याबाबत सायबर तज्ज्ञांची मदत घेतली जाणार आहे. या गुन्ह्याने थेट पोलिसांनाच एक प्रकारे आव्हान दिल्याने पोलिस या गुन्ह्याचा तपास किती जलद गतीने आणि सखोल करतात याकडे आता लक्ष लागून आहे.