कल्याण लोहमार्ग पोलिसांचा अनोखा उपक्रम, आता तरी रेल्वेतील चोऱ्या थांबणार का?
धावत्या ट्रेनमध्ये फटका गँगची गुन्हेगारी वाढत आहे. ही गुन्हेगारी रोखण्यासाठी कल्याण लोहमार्ग पोलिसांनी अनोखा उपक्रम हाती घेतला आहे.

कल्याण : धावत्या ट्रेन मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांच्या दारात उभ्या असलेल्या प्रवाशांच्या हातावर फटका मारुन मोबाईल, पर्स लंपास करण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. चोरी करणाऱ्या चोरांना पकडणे हे पोलिसांचे कर्तव्य आहे. मात्र चोरी करणाऱ्याला पकडण्यापेक्षा ज्या भागातून चोरीचे प्रमाण अधिक आहे, त्याच भागात जाऊन समुपदेशन करणे पोलिसांनी सुरू केले आहे. समुपदेशन केल्यानंतर मागील आठवड्यात गुन्ह्यांची संख्या देखील घटली असल्याची माहिती जीआरपी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांनी दिली. तसेच प्रवाशांनीही ट्रेनच्या दारात उभे राहून प्रवास न करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
मोबाईल, पाकिट चोरीच्या घटनांमध्ये वाढ
कल्याणमधील आंबिवली स्थानकातील इराणी वस्ती चोरी आणि लुटमार आणि गैरव्यवहार करण्यासाठी प्रसिद्ध आहे. कोंबिंग ऑपरेशन करताना अनेकदा या वस्तीतील महिला पुढे येतात आणि पोलिसांनाच मारहाण केली जाते. कल्याण ते आंबिवली स्टेशन दरम्यान नेहमी धावत्या ट्रेन मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांच्या दारात उभे असलेल्या प्रवाशांच्या हातावर फटका मारून मोबाईल किंवा पाकीट चोरी होत असलेल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत.
पोलिसांनी कारवाई करत आंबिवली परिसरातून अनेक आरोपींना बेड्या ठोकत जेलची हवा खाण्यास पाठवले आहे. मात्र तरीही हे सराईत गुन्हेगार न्यायालयातून सुटून येऊन पुन्हा लुटपाटचा धंदा सुरू करतात. त्यात आंबिवली भागात फटका गँग मोठ्या प्रमाणत सक्रिय झाली आहे. यामुळे प्रवाशांच्या जीवाला देखील धोका निर्माण होत आहे.
चोऱ्या रोखण्यासाठी पोलिसांचा अनोखा उपक्रम
अखेर चोराला पकडण्यापेक्षा चोरी करणे ही प्रवृत्ती थांबवली पाहिजे हा उद्देश घेऊन कल्याण रेल्वे आणि लोहमार्ग आणि स्थानिक पोलिसांनी मिळून अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. ज्या भागातून चोरीचे प्रमाण अधिक आहे, त्याच भागात जाऊन लोकांची बैठक घेत त्याचे आणि त्याच्या कुटुंबियांचे समुपदेशन करण्यास पोलिसांनी सुरू केले आहे.