नागपूर / सुनील ढगे : घरात एकटे असल्याची संधी साधत घरात घुसून वृद्धाला मारहाण करुन लुटल्याची घटना नागपुरात हायप्रोफाईल कॉलनीत घडली. इंद्रप्रस्थ लेआऊट येथे धाडसी दरोडा टाकण्यात आला. एका 80 वर्षीय वयोवृध्दाला हातपाय बांधून जखमी करत 32 लाख रुपयाचा ऐवज घेऊन दरोडेखोर पसार झाले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. सुरेश पोटदुखे असं 80 वर्षीय व्यवसायिकांच नाव असून, त्यांचावर सध्या उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती ठीक असल्याच सांगितलं जातं आहे. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी चार पथके तयार केली आहेत.
सुरेश पोटदुखे हे इंद्रप्रथ ले आउट येथे एकटेच राहतात. पोटदुखे यांचा मुलगा आणि पत्नी परदेशात राहतात. मंगळवारी पहाटे तीन अज्ञात दरोडेखोरांनी घराच्या मागील बाजूने प्रवेश केला. त्यानंतर घरात एकटेच असणारे सुरेश पोटदुखे यांना मारहाण करत हातपाय बांधले. लॉकरची चावी मागत त्यांना कमरेखाली चाकूने वार करत जखमी केले. त्यानंतर घरातील ऐवज आणि रोख असा 32 लाखाचा मुद्देमाल घेऊन पसार झाले.
जखमी सुरेश पोटदुखे हे मंगळवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास शेजाऱ्यांना आवाज देत घराच्या दारावर आले. यानंतर ही घटना उघडकीस आली. शेजाऱ्यांनी सुरेश पोटदुखे यांना रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी सोनेगाव पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. सोनेगाव पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करत अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद करत तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासत आरोपींचा शोध सुरू केला आहे. आरोपीच्या शोधासाठी चार पथकं बनविण्यात आले आहेत. मात्र या घटनेमुळे पुन्हा एकदा वृद्धांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.