जशपूर : साप पाहिला की लहान मुलेच काय मोठ्यांची पण घाबरगुंडी उडते. जर सापाने दंश केलाच तर घाबरुन लोकं आधीच अर्धमेले होतात. मात्र छत्तीसगडमधील जशपूरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. साप चावल्यानंतर न घाबरता उलट मुलाने त्याच्यावरच पलटवार केला. जिल्ह्यातील पांदरपथ येथे ही घटना घडली आहे. एका बालकाला विषारी साप चावला. यामुळे भडकलेल्या मुलाने सापालाच उलट चावा घेतला. यानंतर साप जागीच मरण पावला.
मुलाच्या कुटुंबीयांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले. मात्र मुलाची प्रकृती एकदम ठीक आहे. जशपूरमध्ये मोठ्या प्रमाणात साप आढळतात. त्यामुळेच येथे साप चावण्याच्या घटनाही मोठ्या प्रमाणात घडत असतात.
पांडरपथ येथे राहणारा डोंगरी कोरवा बालक हा त्याच्या घरापासून काही अंतरावर बहिणीच्या घरी गेला होता. तेथे खेळत असतानाच अचानक नागाने त्याच्या हाताला दंश केला. मात्र सर्पदंशानंतर कोलमडून न जाता बेधडक मुलगा संतापला.
साप तिथून निघून जाण्यापूर्वीच मुलाने त्याला पकडून दाताने जोरदार चावा घेतला. यादरम्यान सापाने मुलाच्या हाताला गुरफटून घेतले होते. मात्र, मुलानेही सापाला चावा घेऊन त्याला गंभीर जखमी केले, यात साप जागीच मरण पावला.
ही घटना मुलाने त्याच्या बहिणीला सांगितली. बहिणीने आजोबांना सर्व प्रकार सांगितला. मुलाला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. आता तो पूर्णपणे बरा आहे.
जशपूरमध्ये कोब्रा आणि क्रेटच्या सर्वात विषारी प्रजाती आढळत असल्याने या जिल्ह्याला छत्तीसगडचा नागलोक म्हणूनही ओळखले जाते. छत्तीसगडमध्ये आढळणाऱ्या सापांपैकी 80 टक्के साप एकट्या जशपूरमध्ये आढळतात, असे म्हटले जाते. येथे सापांच्या 70 हून अधिक प्रजाती आढळतात.