दिल्ली : श्रद्धा वालकर हत्याकांडाने दिल्लीसह देशाला हादरवून टाकले असतानाच दिल्लीत आणखी एक हत्याकांड उघड झाले आहे. पतीची हत्या करुन मृतदेह फ्रिजमध्ये ठेवणाऱ्या मायलेकाला पोलिसांनी अटक केली आहे. अंजन दास असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. श्रद्धा हत्याकांडाप्रमाणे अंजन दासची हत्या करण्यात आली. त्यानंतर मायलेकांनी मृतदेहाचे तुकडे एक एक करुन फेकले. दिल्लीतील पांडवनगरमध्ये ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
पूनम दास असे पत्नीचे तर दीपक दास असे मुलाचे नाव आहे. पूनम दासने पतीला आधी नशेच्या गोळ्या खाऊ घातल्या, त्यानंतर मुलाच्या मदतीने त्याची हत्या केली.
अंजन दास याचे अनेक महिलांशी अनैतिक संबंध होते. यावरुन नेहमी घरात वाद होत असत. याच वादातून मायलेकांनी मिळून अंजन दासचा काटा काढला.
अंजनची हत्या केल्यानंतर मायलेकांनी मृतदेहाचे तुकडे करुन फ्रिजरमध्ये लपवले. यानंतर संधी मिळेल तशी एक एक करुन तुकडे अक्षरधामसह पांडवनगर परिसरात विविध ठिकाणी फेकले.
काही दिवसांपूर्वी पांडवनगर परिसरात पोलिसांनी मानवी मृतदेहाचे काही तुकडे सापडले होते. यानंतर पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरु केला. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळाच्या आसपासच्या परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले.
सीसीटीव्ही तपासले असता पोलिसांनी घटनास्थळी एक महिला आणि एक तरुण संशयास्पदरित्या दिसून आले. पोलिसांनी त्या दोघांचा शोध घेत त्यांना ताब्यात घेतले. दोघांची कसून चौकशी केली असता मृतदेहाची ओळख पटली आणि हत्याकांडाचे रहस्य उलगडले.
पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. तसेच आरोपींच्या घरातून मृतदेह ठेवलेला फ्रीजही जप्त करण्यात आला आहे. पोलीस पुढील कारवाई करत आहेत.