एकमेकांना बोट दाखवत खाणाखुणा केल्या, दोन गटात तुंबळ हाणामारी
दीपेश आणि भिसे यांच्यात शाब्दिक बाचाबाची सुरू असतानाच एकमेकांना बोट दाखवत असल्याने या ठिकाणी मारहाण सुरू झाली. हा सर्व प्रकार कॅमेरात कैद झाला असून पोलिसांनी दोन्ही गटांवर गुन्हे दाखल करुन तपास सुरू केला आहे.
डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील दत्तनगर चौकात मंगळवारी रात्री तरुणांच्या दोन गटात एकमेकांना बोट दाखवत खाणाखुणा करण्यावरुन जोरदार राडा झाला. दोन्ही गटांनी एकमेकांना बेदम मारहाण केली. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. या प्रकरणी दोन्ही गटांनी रामनगर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत. रामनगर पोलीस पुढील तपास करत आहेत.
काय आहे प्रकरण?
डोंबिवली दत्तनगर चौकातील नीलेश चायनिज कॉर्नर येथे मंगळवारी रात्री साडे दहा वाजता दीपेश भानुशाली हे त्याच्या मित्रांसोबत चायनिज खात उभे होते. त्यावेळी त्यांच्या घरासमोर राहणारा चिन्मय भिसे हा त्याच्या मित्राच्या दुचाकीवरुन चालला होता.
यावेळी भिसे याच्या सांगण्यावरुन दुचाकीस्वाराने दुचाकी मागे वळवून तो दीपेश यांच्या दिशेने आला आणि मला तू काय म्हणालास असे बोलून शिवीगाळ करुन निघून गेला. चिन्मयने त्याचा मामा प्रशांत सावर्डेकर, भाऊ सागर यांना घरी जाऊन घडला प्रकार सांगून त्यांना घटनास्थळी आणले.
बाचाबाची दरम्यान एकमेकांना बोट दाखवले
यावेळी दीपेश आणि भिसे यांच्यात शाब्दिक बाचाबाची सुरू असतानाच एकमेकांना बोट दाखवत असल्याने या ठिकाणी मारहाण सुरू झाली. हा सर्व प्रकार कॅमेरात कैद झाला असून पोलिसांनी दोन्ही गटांवर गुन्हे दाखल करुन तपास सुरू केला आहे.
रात्री दहा वाजेपर्यंत सार्वजनिक ठिकाणी व्यवसाय करण्यास मुभा असताना पोलिसांच्या आशीर्वादाने शहराच्या विविध भागांमध्ये रात्री उशिरापर्यंत चायनिज गाड्या सुरू असतात. अनेक ठिकाणी अशा प्रकारची घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.