उल्हासनगर / निनाद करमरकर : वाद मिटवण्यासाठी गेलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकालाच गुंडांनी मारहाण केल्याची घटना उल्हासनगरमध्ये उघडकीस आली आहे. उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात ही घटना घडली. कर्तव्यावर असलेल्या एका पोलिसाला दोन गुंडांनी मारहाण केली. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या दोन्ही आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मारहाणीची ही घटना मोबाईलमध्ये चित्रित करण्यात आला आहे. आकाश गायकवाड आणि गणेश कांबळे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अरुण कोकितकर हे सुरक्षेसाठी मध्यवर्ती रुग्णालयात ड्युटीवर होते. रात्री सव्वा बाराच्या सुमारास आरोपी आकाश गायकवाड आणि गणेश कांबळे यांच्यामध्ये मध्यवर्ती रुग्णालयात वाद सुरू होता. यावेळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अरुण कोकितकर यांनी या वादात हस्तक्षेप केला असता, दोन्ही आरोपींनी त्यांच्यावर हात उगारला आणि त्यांचा शर्ट पकडला.
या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. या दोघांचाही पूर्वीचा गुन्हेगारी रेकॉर्ड असून, त्यानुसार त्यांच्यावर कारवाई सुरू असल्याची माहिती मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली.
जुन्या वादातून दोन तरुणांमध्ये हाणामारी झाल्याची घटना इचलकरंजीत घडली आहे. या तरुणांमध्ये याआधीही मारहाणीची घटना घडली होती. स्वप्निल बन्ने आणि निखिल नाईक अशी हाणामारी करणाऱ्या तरुणांची नावे आहेत. हाणामारीत दोघेही तरुण जखमी झाले असून, दोघांना उपचारासाठी इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.