मित्र-मैत्रिणी बाईकवर बसले होते, भररस्त्यात अचानक जे घडले त्याने सर्वच हादरले !
तरुण-तरुणी बाईकवरुन चालले होते. काही कारणाने दोघे रेल्वे वसाहतीजवळ थांबले. मात्र अचानक त्यांच्यावर हल्ला सुरु झाला. या घटनेमुळे सर्वच हादरले.
सुनील जाधव, कल्याण : कल्याणच्या पूर्वेकडील रेल्वे वसाहतीजवळ एका अनोळखी इसमाने कोणतेही कारण नसताना अचानक एक तरूण आणि त्याच्या मैत्रिणीवर मारहाण करत चाकूने सपासप वार केले. या चाकू हल्ल्यात दोघेही जखमी झाले आहेत. या संदर्भात जखमी तरुण-तरुणीने दिलेला तक्रारीवरून कोळसेवाडी पोलिसांनी अनोळखी हल्लेखोराच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरू केला आहे. अनोळखी इसमाने तेथून पळ काढल्यानंतर जखमी अवस्थेत मयूर याने कोळसेवाडी पोलिस ठाणे गाठले आणि घडलेला प्रसंग कथन केला. या संदर्भात पोलिसांनी तरुणाच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवून त्या माथेफिरूचा शोध सुरू केला आहे.
रेल्वे वसाहतीजवळ बाईक थांबवली
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्वेतील चिंचपाडा भागातील साई सहारा कॉम्प्लेक्समध्ये राहणारा मयूर राजू नाईक हा तरूण मंगळवारी रात्री सव्वाअकरा वाजता रूपाली नावाच्या मैत्रिणीसह कल्याण पूर्व रेल्वे स्थानक भागात दुचाकीवरुन आला. दुचाकीवरुन येत असताना हातातील पिवशी रूपालीला पेलवत नव्हती. त्यासाठी मयूर याने रेल्वे वसाहतीजवळ दुचाकी थांबवली.
एका इसमाने तरुणाला निघून जाण्यास सांगितल्याने वाद
रूपालीकडील जड पिवशी दुचाकीच्या पुढील भागात ठेवण्याचा प्रयत्न मयूरने केला. इतक्यात तेथे एक जण आला. तुम्ही येथे का थांबले? येथून निघून जा, असे त्याने दरडावले. तुला काय करायचे, आम्ही येथून जातोय, असे मयूर याने उत्तर देताच भडकलेल्या त्या अनोळखी इसमाने मयूरच्या कानाखाली आवाज काढला. त्यानंतर शिवीगाळ करत त्याने खिशातून काढलेल्या चाकूने मयूरवर हल्ला केला.
हा प्रकार पाहून घाबरलेल्या रूपालीने दुचाकीवरून उतरून मयूरशी होत असलेला प्रकार रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्या अनोळखी इसमाने मैत्रिणीवरही चाकूने हल्ला चढवला. हा सारा प्रकार घडत असताना मयूर आणि त्याच्या मैत्रिणीला वाचविण्यासाठी कुणीही धाऊन आला नाही.