तरुणांनी चार पॅकेट बिर्यानी घेतली, पैसे मागितले असता आधी शिवीगाळ केली मग तिघांवर फेकले उकळते तेल; घटना सीसीटीव्हीत कैद
दोघांनी चार पॅकेट बिर्यानी घेतली. हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी जेव्हा त्यांच्याकडे पैसे मागितले असता त्यांनी नंतर देतो असे सांगितले. मात्र हॉटेलमालकाने याला नकार दिला.
चेंगलपट्टू : बिर्यानीचे पैसे मागितले म्हणून माथेफिरु तरुणांनी हॉटेलमालकासह तिघांना अर्वाच्च भाषा वापरत त्यांच्यावर उकळते तेल फेकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तामिळनाडूतील चेंगलपट्टूमध्ये ही घटना घडली आहे. या घटनेत तिघेही गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जयमणी, मणिकंदन आणि नेमराज अशी जखमी तिघांची नावे आहेत. जखमींमध्ये हॉटेल मालक, मालकाचा मुलगा आणि हॉटेलमधील कर्मचाऱ्याचा समावेश आहे.
आरोपींनी बिर्यांनी घेतली
चेंगलपट्टू येथील एका रेस्टॉरन्टमध्ये सकाळी 10.30 च्या सुमारास अजित आणि कार्तिक नामक दोन तरुण आले. दोघांनी चार पॅकेट बिर्यानी घेतली. हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी जेव्हा त्यांच्याकडे पैसे मागितले असता त्यांनी नंतर देतो असे सांगितले.
पैसे न दिल्याने हॉटेलमालकाने बिर्याणी देण्यास नकार दिला
मात्र हॉटेलमालकाने याला नकार दिला. यानंतर हे दोघे निघून आले आणि थोड्या वेळाने आपल्या अन्य चार साथीदारांना घेऊन आले. हे सर्व जण हॉटेल मालक, त्याचा मुलगा आणि एका कर्मचाऱ्याला शिवीगाळ करु लागले.
आरोपींना विरोध केला असता उकळते तेल अंगावर फेकले
तरुणांना विरोध केला असता त्यांच्यापैकी एकाने या तिघांवर उकळते तेल फेकले. तसेच किचनमधील स्टोव्ह आणि भांडीही इतरत्र फेकली. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेत तिघेही गंभीर जखमी झाले आहेत.
सीसीटीव्हीच्या आधारे पाच आरोपींना अटक
याप्रकरणी स्थानिक पोलिसात नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पाच आरोपींना अटक केली आहे. एक आरोपी सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.