गुरुग्राम : पॉलिग्राफ चाचणीनंतर लॅबमधून जेलमध्ये नेत असताना सोमवारी संध्याकाळी आफताबवर तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न आला होता. हल्लेखोरांनी आफताबला घेऊन जाणाऱ्या पोलीस व्हॅनवरही हल्ला केला होता. हे सर्व हल्लेखोर गुन्हेगारी संघटनेचे सदस्य असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपींपैकी दोघे जण तोता गँगचे सदस्य असून इतर सर्व त्यांचे साथीदार आहेत. हल्ला झाला त्या दिवशी पोलिसांनी कुलदीप ठाकूर नामक आरोपीला अटक केली होती. कुलदीप ठाकूर हा हिंदू सेनेचा हरियाणातील प्रदेश अध्यक्ष आहे.
कुलदीप ठाकूर, सोमे, निगम गुर्जर, दान सिंह, पिंटू आणि आकाश अशी आफताबवर हल्ला करणाऱ्या सहा आरोपींची नावे आहेत. सर्व नशेडी आहेत.
सोमवारी पॉलिग्राफ चाचणीनंतर दिल्लीतील रोहिणी परिसरातून तिहार जेलमध्ये आफताबला नेत असताना या हल्लेखोरांनी त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी निगम गुर्जर आणि कुलदीप ठाकूरला ताब्यात घेतले.
पोलिसांनी हवेत गोळीबार केल्याने आरोपी पांगले
आरोपींनी योजनाबद्ध पद्धतीने आपली कार पोलीस व्हॅनच्या पुढे उभी केली. पोलीस व्हॅनवर तलावारीने हल्ला केला. व्हॅनचा दरवाजाही खोलला होता. मात्र पोलिसांनी हवेत गोळीबार केल्याने आरोपी पांगले.
कुलदीप ठाकूर हा धनकोट येथील राहणारा असून, त्याच्यावर राजेंद्र पार्क पोलीस ठाण्यात मारामारी आणि मानेसर परिसरात शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल आहे. कुलदीप तोता गँगचा गुंड आहे. हल्ला करणारे सहा आरोपी गुरुग्राममधील विविध भागात राहणारे आहेत.
सर्व आरोपी हिंदू सेनेशी संबंधित आहेत. सर्व आरोपी गेल्या अनेक दिवसांपासून आफताबवर हल्ल्याचा कट रचत होते, असा खुलासा हिंदू सेनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरजीत यादव यांनी केला. आफताबला कोर्टात आणले असतानाच आरोपींना त्याच्यावर हल्ला करायचा होता.
आरोपींना आफताब आणि दिल्ली पोलिसांचे लोकेशन कसे कळले याबाबत पोलीस तपास करत आहेत. तसेच पोलिसांना चकवा देत तलवार घेऊन आरोपी घटनास्थळी कसे आले याचाही पोलीस शोध घेत आहेत.