कल्याण / 3 ऑगस्ट 2023 : कल्याणमध्ये भयंकर घटना उघडकीस आली आहे. एका अल्पवयीन मुलीला रस्त्यात अडवून भररस्त्यात तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पीडितेने कशीबशी सुटका करुन घर गाठले आणि सर्व प्रकार सांगितला. यानंतर घरच्यांनी तात्काळ कोळसेवाडी पोलीस ठाणे गाठले. मात्र पोलिसांनी मुलीची तक्रार घेण्यासाठी तब्बस सात तास ताटकळत ठेवले. यानंतर मध्यरात्री 12 नंतर पीडितेची तक्रार नोंदवण्यात आली. यानंतर आरोपीला ताब्यात घेतले आहे. विशाल गवळी असे आरोपीचे नाव असून, तो सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर याआधीही बलात्कार, पोस्को, चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. आरोपीला तडीपारही करण्यात आले होते. मात्र आरोपी एका राजकीय नेत्याचा नातेवाईक असल्याने सुटून येतो आणि पुन्हा गुन्हा करायला मोकळा होतो.
पीडित मुलगी सायंकाळी 4 च्या सुमारास क्लासवरुन येत होती. यावेळी आरोपी विशालने स्कूटीवरुन पाठलाग करत तिला रस्त्यात गाठले. यानंतर रस्त्यावरच तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मुलीने मदतीसाठी आरडाओरडा केला, मात्र आरोपीच्या भीतीने कुणी मदतीला आले नाही. यानंतर मुलीने त्याला प्रतिकार करत कशीबशी स्वतःची सुटका करत तेथून पळ काढला.
मुलीने घरी जाऊन सर्व प्रकार सांगितला. यानंतर मुलीच्या वडिलांनी आरोपीला जाब विचारला असता, आरोपीने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर मुलीने पालकांसोबत कोळसेवाडी पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत गुन्हेगाराला अटक करणे अपेक्षित होते. मात्र पोलिसांनी तब्बल सात तास पीडितेची तक्रारच घेतली नाही.
सात तासानंतर मध्यरात्री पोलिसांनी मुलीची तक्रार नोंदवून घेतली. पोलिसांनी भारतीय दंडसंहिता कलम 354 ए, 354 डी, 323, 504, 506, पोस्को सेक्शन 8 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. आरोपी एका राजकीय नेत्याचा नातेवाईक आहे.
गेल्या काही दिवसांपासून कल्याण कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हत्या, मारहाण, गँगवॉर, चोरी, घरफोडी सारखे अनेक गुन्हे घडत आहे. आता विद्यार्थिनीवर अत्याचाराच्या प्रयत्नामुळे कोळसेवाडी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेवरुन गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिला नसल्याचे स्पष्ट होते.