दुसऱ्या पत्नीपासून सुटका मिळवण्यासाठी पतीने केले ‘हे’ भयानक कृत्य, पण म्हणतात ना ‘देव तारी त्याला कोण मारी’
दोन वेळा सर्पदंश होऊन, विषारी इंजेक्शन देऊनही महिला यातून बचावली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पती आणि त्याच्या साथीदारांना अटक केली आहे.
मंदसौर : मध्य प्रदेशातील मंदसौरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पत्नीपासून सुटका मिळावी आणि कायद्याच्या कचाट्यात अडकू नये यासाठी एका व्यक्तीने वेगळीच शक्कल लढवली. त्याने आपल्या पत्नीला विषारी सापाच्या दंशाने मारण्याचा प्रयत्न केला. यासाठी सहा तासात दोनवेळा सर्पदंश केला. पण म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी, तसेच काहीसे या महिलेच्या बाबतीत झाले. दोन वेळा सर्पदंश होऊन, विषारी इंजेक्शन देऊनही महिला यातून बचावली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पती आणि त्याच्या साथीदारांना अटक केली आहे.
काय आहे प्रकरण?
मंदसौरमधील माल्या खेडी गावात राहणारा मोजिम अजमेरी याचा आधीच विवाह झाला होता. मात्र तस्करी प्रकरणी मोजिम तुरुंगात गेल्यानंतर त्याची पहिली पत्नी त्याला सोडून गेली होती. यानंतर तुरुंगातून बाहेर आल्यानंतर मोजिमने हालिमासोबत दुसरा विवाह केला.
काही दिवस सर्व ठीक सुरु होते. मात्र अचानक मोजिमची पहिली पत्नी त्याच्या आयुष्यात परत आली. याची माहिती हलिमाला मिळाल्यानंतर त्यांच्यात वाद होऊ लागले. मोजिम हलिमाला मारहाणही करु लागला. हलिमापासून सुटका मिळवण्यासाठी मोजिमने तिला संपवण्याचा कट रचला.
पत्नीजवळ विषारी साप सोडला
यासाठी मोजिमचे साथीदार रमेश आणि काला यांनी एका बॅगेत विषारी साप भरुन आणला. मग तिघांनी मिळून हलिमाजवळ विषारी साप सोडून सर्पदंश करवला. विषारी इंजेक्शनही दिले. तरीही हलिमाचा जीव गेला नाही म्हणून पुन्हा सर्पदंश करवला. यानंतर तिला गंभीर अवस्थेत सोडून सर्वजण पळून गेले.
शेजाऱ्यांनी याबाबत हलिमाच्या वडिलांना कळवली. त्यानंतर हलिमाच्या वडिलांनी धाव घेत तिला रुग्णालयात दाखल केले. उपचारानंतर हलिमाची प्रकृती ठीक आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याबाबत गुन्हा दाखल केला आहे.