गोदाकाठी कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या मावशी-भाची, अचानक पाय घसरला अन्…
अर्चना सोनवणे आणि गौरी शिंदे हे कोपरगाव तालुक्यातील कान्हेगाव येथे दिवाळीच्या सुट्टीनिमित्त मंगेश चव्हाण यांच्या येथे मामाच्या गावी आल्या होत्या.
कोपरगाव : दिवाळीनिमित्त भाऊबीजेची सर्वत्र धामधूम सुरू असताना कोपरगाव तालुक्यातील कान्हेगाव (Kanhegaon Kopargaon) शिवारात एक दुर्दैवी घटना घडली आहे. गोदावरी नदीकाठी (Godavari River) कपडे धुण्यासाठी गेलेल्या मावशी आणि भाचीवर काळाने घाला घातलाय. गोदावरी नदीच्या पाणीपत्रात बुडून मावशी भाचीचा दुर्दैवी मृत्यू (Death) झाल्याची धक्कादायक घटना आज दुपारच्या सुमारास घडली आहे. या दुर्दैवी घटनेने कान्हेगावसह कोपरगाव तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
अर्चना जगदीश सोनवणे असे 35 वर्षीय मावशीचे आणि गौरी शरद शिंदे असे 18 वर्षीय भाचीचे नाव आहे. याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दिवाळी सुट्टीनिमित्त मामाच्या गावी आल्या होत्या दोघी
अर्चना सोनवणे आणि गौरी शिंदे हे कोपरगाव तालुक्यातील कान्हेगाव येथे दिवाळीच्या सुट्टीनिमित्त मंगेश चव्हाण यांच्या येथे मामाच्या गावी आल्या होत्या. आज सकाळी गोदावरी नदीकाठी काही महिला आणि एक मुलगा धुणे धुण्यासाठी गेले होते.
दोघीही पाय घसरुन पाण्यात पडल्या
यावेळी मावशी आणि भाचीचा पाय घसरून त्या नदीपात्रात पडल्या. त्यांना वाचवण्यासाठी इतर 3 महिलांनी पाण्यात उडी मारली. मात्र त्यांना देखील पाण्याचा अंदाज न आल्याने त्याही बुडणारच होत्या.
अन्य तिघींना वाचवण्यात यश
मात्र ही बाब लक्षात येताच जवळच असलेल्या एका मुलाने पाण्यात उडी मारली आणि तिघा महिलांना वाचवले. मात्र या दोघींना वाचवण्यात त्याला अपयश आले. घटनेची माहिती वाऱ्यासारखी कान्हेगाव परिसरात पसरल्यानंतर गावकरी नदीकाठी पोहोचले.
स्थानिक ग्रामस्थांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना पाण्यातून बाहेर काढून कोपरगाव ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले असता तेथे उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
याबाबत कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पीएसआय तुषार धाकराव, पोलीस उपनिरीक्षक महेश कुसारे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह पोहोचून पंचनामा केला. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
घटनेचा अधिक तपास कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.