कारमध्ये लिफ्ट घेतली, किळसवाणे कृत्य करणारा ‘तो’ पोलीस अधिकारी बडतर्फ झालाच पाहिजे, अंबादास दानवेंची काय मागणी?
पोलिस अधिकारी विशाल ढुमे याला केवळ निलंबित करून थांबता येणार नाही तर बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे.
दत्ता कनवटे, औरंगाबादः माझ्याकडे गाडी नाही, तुमच्या कारमध्ये येऊ द्या, असं म्हणत लिफ्ट (Lift) मागितली. कारमध्ये बसल्यावर महिलेसोबत अत्यंत किळसवाणे कृत्य करणाऱ्या औरंगबादच्या (Aurangabad) त्या पोलीस अधिकाऱ्याला बडतर्फ केलंच पाहिजे, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केली आहे. विशाल ढुमे (Vishal Dhume) या पोलीस अधिकाऱ्यावर विनयभंग प्रकरणी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मात्र एवढ्यावर थांबता येणार नाही तर त्याला बडतर्फ करावे, अशी मागणी दानवे यांनी केली आहे.
काय आहे प्रकरण?
शहरातील सिटी चौक पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या एफआयआरनुसार, क्राइम ब्रांचचे एसीपी विशाल ढुमे १४ जानेवारी रोजी शनिवारी रात्री एका हॉटेलमध्ये होते. तेथे त्यांची भेट एका व्यक्तीसोबत झाली. पोलीस अधिकाऱ्याच्या मते, तो त्यांचा मित्र होता. सदर व्यक्ती त्याच्या पत्नीसोबत हॉटेलमध्ये आला होता.
विशाल ढुमे यांनी माझ्याकडे गाडी नाही, तुम्ही मला घेऊन चला, अशी विनंती केली. विशाल ढुमे कारमध्ये मागील सीटवर बसला होता. शहराचे एसीपी असल्याने सदर व्यक्तीने त्याला कारमध्ये बसवलं.
पीडितेच्या तक्रारीनुसार, ती महिला कारमध्ये समोरील सीटवर बसली होती. विशाल ढुमेने तिच्या पाठीवरून हात फिरवायला सुरुवात केली. एसीपीचं हे घाणेरडं कृत्य पाहून पती-पत्नी दोघेही घाबरले. त्यानंतर कार मालकाचे घर आल्यानंतरही एसीपीने तुमच्या घरात मला येऊ द्या, वॉशरुम वापरू द्या, असा हट्ट सुरु केला.
घरात येण्यापासून रोखल्यानंतर एसीपीने तेथे जमलेल्या लोकांनाही मारहाण सुसरू केली. त्यानंतर महिलेने रात्री पोलीसांना फोन करून ही माहिती दिली. त्यानंतर सिटी चौक पोलीस स्टेशनमध्ये सदर महिलेने तक्रार दाखल केली.
औरंगाबादचे आमदार व विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी त्या रात्रीच पोलीस स्टेशनमध्ये येऊन विशाल ढुमेविरोधात कारवाई करण्याची मागणी केली. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीदेखील सदर महिलेची भेट घेतली. या पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्याची मागणी केली.
बडतर्फीची कारवाई होणार..
पोलिस अधिकारी विशाल ढुमे याला केवळ निलंबित करून थांबता येणार नाही तर बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्र्यांशी देवेंद्र फडणवीस आणि नीलम गोऱ्हे यांच्याशी बडतर्फी संदर्भात बोलणे झाले आहे. पोलीस अधिकारी विशाल ढुमेवर निलंबनाची कारवाई झाली आणि या प्रोसेस नंतर सरकार बडतर्फ करेल, अशी माहितीही विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी दिली.