औरंगाबाद : औरंगाबाद शहरात ऑनलाईन पार्सल सुविधेच्या माध्यमातून शस्त्रास्त्रांची तस्करी करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. औरंगाबाद शहरातील जिंसी पोलिसांनी ऑनलाइन पार्सल आलेल्या तब्बल 49 तलवारी आणि धारदार शस्त्रे जप्त केली आहेत. (Aurangabad Online Swords Weapons Smuggling Racket burst)
ऑनलाईन शस्त्रास्त्र तस्करी प्रकरणातील आरोपीला देखील ताब्यात घेतले आहे, तब्बल 49 तलवारी आणि धारदार शास्त्रांमुळे मोठे गुन्हे घडण्याची शक्यता होती. परंतु औरंगाबाद पोलिसांनी ही धडक कारवाई करत पुन्हा एकदा गुन्हे घडण्याच्या आधीच शस्त्रास्त्रांच्या तस्करीचा पर्दाफाश केला आहे. ही विशेष कामगिरी जिन्सी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी केली असून या कारवाईचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
मुंबईतून तरुणाला शस्त्रांसह अटक
दुसरीकडे, मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट 7 ने काही दिवसांपूर्वीच मुलुंड परिसरातून 21 वर्षीय तरुणाला शस्त्रांसह अटक केली होती. आरोपीकडून देशी बनावटीच्या दहा पिस्तूल जप्त करण्यात आल्या होत्या. आरोपीकडून 10 पिस्तुलांसोबत 12 काडतुसंही जप्त करण्यात आली. तसेच केएफ मेडच्या 6 राउंडचाही समावेश आहे.
संपूर्ण कुटुंबाचा अवैध शस्त्र कारखाना
21 वर्षांचा आरोपी लखनसिंह चव्हाण मध्य प्रदेशातील बरुवानी जिल्ह्यातील रहिवासी असून त्याने मध्य प्रदेशात अवैध शस्त्रे बनवण्याचा कारखाना सुरु केला होता. तिथे त्याचं संपूर्ण कुटुंब या व्यवसायात सहभागी असल्याचं उघड झालं आहे. तो मुंबईसह मध्य प्रदेश, गुजरात अशा अनेक ठिकाणी शस्त्रं पुरवत असल्याचा आरोप आहे.
खासगी वाहनांनी मध्य प्रदेशहून प्रवास
लखनसिंह आपल्या घरात शस्त्रे बनवून विक्री करत असे. तपासात असे समोर आले आहे की, त्याचे मामासुद्धा आपल्या कुटुंबासह या व्यवसायात सहभागी आहेत. लखन सिंह स्वत: अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या शहरात शस्त्रं पोहोचवत होता. याबाबत कोणाला शंका येऊ नये म्हणून बहुतेकदा तो खासगी वाहनांनी प्रवास करुन शस्त्रं पुरवत मध्य प्रदेशात परत निघून जात होता.
संबंधित बातम्या :
साताऱ्यातील मोरे गल्लीत शस्त्रसाठा, 55 बंदुका जप्त
कुटुंबाचा अवैध शस्त्राचा कारखाना, मुंबईत दहा पिस्तुलांसह 21 वर्षांचा तरुण पोलिसांच्या जाळ्यात
(Aurangabad Online Swords Weapons Smuggling Racket burst)