रिक्षा पार्क करण्यापासून रोखले, संतापलेल्या ड्रायव्हरने गार्डलाच संपवले..
इमारतीतील पार्किंगमध्ये ऑटो पार्क करण्यास मित्र नेहमी मना करत असे. त्या मुद्यावरून दोघांमध्ये झालेल्या भांडणाचे पर्यवसन वादात झाले अन् मग...
रांची : एका इमारतीत गार्ड (guard was killed) म्हणून कार्यरत असलेल्या इसमाची शुल्लक कारणावरून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इमारतीच्या पार्किंगमध्ये रिक्षा (dispute over parking) उभी करण्यास मनाई केली म्हणून ओळखीच्याच इसमाने त्याचा काटा काढल्याचे समजते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व मृत गार्ड हे दोघे एकमेकांना चांगलं ओळखायचे. दोघे बऱ्याच वेळेस एकत्र मद्यपानही करायचे. मात्र एका शुल्लक कारणावरून त्या इसमाने त्याचाच मित्र असलेल्या गार्डची निर्घृण हत्या केली.
खरंतर हे प्रकरण झारखंडच्या रांची शहरातील तुपुदाना ओपी परिसरात असलेल्या बसारगड येथील आहे. विद्यानंद वर्मा नावाचा इसम एका इमारतीत गार्ड म्हणून कार्यरत होता. तर आरोपी संजय मिश्रा हा रिक्षाचालक आहे. विद्यानंद व संजय या दोघांचीही ओळख होती. ते चांगले मित्रही होते. दररोज एकमेकांना भेटायचे, गप्पाही मारायचे.
धारदार शस्त्राने केली हत्या
मात्र शनिवारी रात्री विद्यानंद याची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. हत्येची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला व तो तत्काळ पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. त्या तपासादरम्यान पोलिसांनी विद्यानंद ज्या अपार्टमेंटमध्ये गार्ड म्हणून काम करायचा त्यासह आजूबाजूच्या परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले.
सीसीटीव्हीमध्ये आढळला आरोपी
त्यावेळी पोलिसांना संजय मिश्रा घटनास्थळाच्या आसपास फिरताना दिसला. संशयावरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले अन् चौकशी सुरू केली. सुरूवातीला संजयने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी कठोरपण चौकशी केल्यावर त्याने, आपणच विद्यानंदची हत्या केल्याचे कबूल केले.
रागात केला खून
आरोपी संजयने पोलिसांना सांगितले की, तो अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये ऑटो पार्क करत असे. मात्र विद्यानंद त्याला प्रत्येक वेळी नकार देत असे. शनिवारीही त्याने ऑटो पार्क करण्यास नकार दिला व त्यावरून दोघांमध्ये भांडण झाले. रागाच्या भराच आपणच विद्यानंदचा खून केला, अशी कबुली संजयने दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून हत्येसाठी वापरण्यात आलेले शस्त्रही ताब्यात घेण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले.