Mumbai Crime : विवाहानंतर प्रेमात पडली, प्रियकरासोबत तीन वर्षे राहिली, अखेर प्रियकराने डाव साधला
पुण्याहून मुंबईत पळून आलेल्या एका विवाहीत महिलेची तिच्या प्रियकराने क्रूरपमे हत्या केली. त्यानंतर त्याने स्वत:वरही वार करू संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो बचावला आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेचा तपास करण्यासाठी कुरार पोलीसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

गोविंद ठाकूर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 19 जानेवारी 2024 : ज्या इसमावर विश्वास ठेवून ती तीन वर्षांपूर्वी, घरदार नवरा सगळं सोडून पळून मुंबईत आली. त्याच इसमाने जेव्हा तिच्यावर वार केले, तेव्हा तिला काय यातना झाल्या असतील.तिच्या प्रियकराने सर्वासमोरची तिची निर्घृण हत्या केली. मुंबईतील मालाड पूर्व कुरार येथील ही धक्कादायक घटना आहे. पुण्याहून मुंबईत पळून आलेल्या एका विवाहीत महिलेची तिच्या प्रियकराने हत्या केली. बाबुराव मोरे असे आरोपीचे नाव असून तो एका रिक्षाचालक आहे. प्रेयसीच्या हत्येनंतर त्याने स्वत:लाही संपवण्याचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी ठरला. सध्या त्याच्यावर शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गंभीर जखमी झालेला आरोपी सध्या बोलण्याच्या स्थितीत नाहीये, त्यामुळे त्याचा जबाब नोंदवलेला नाही. याप्रकरणी कुरार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत.
रिक्षा चालवताना प्रेमात पडले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नयना असे मृत महिलेचे नाव आहे. आरोपी बाबुराव आणि नयना हे पुण्यातील एका गावातील रहिवासी. पुण्यात असताना नयना ही ऑटोरिक्षा चालवायची, बाबुरावही ऑटोचालक. त्याचदरम्यान दोघांची ओळख झाली. नयना हिचा पती दारू प्यायचा आणि तिला रोज मारहाण करायचा. त्याच्या कचाट्यातून सुटण्यासाठी नयनाने बाबुराव मोरेसोबत प्लान आखला आणि मुंबईत येण्याचा निर्णय घेतला
तीन वर्षांपूर्वी पतीला सोडून मुंबईत आली
2020 साली नयना आणि बाहुराव हे दोघे मुंबईत आले. कुरार येथे ते दोघे नयनाच्या मुलांसोबत राहू लागले. सगळं काही ठीक सुरू होतं, पण चार दिवसांपूर्वी नयना आणि बाबुराव मोरे यांच्यात काही कारणावरून वाद झाला. त्यानंतर बाबुरावने धारदार शस्त्राने नयनावर वार करून तिची हत्या केली. नंतर त्याने त्याच शस्त्राने स्वत:वरही वार करू आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला पण तो यशस्वी झाला नाही. जखमी अवस्थेतील बाबुरावला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तो सध्या बोलण्याच्या स्थितीत नाहीये, त्यामुळे त्याचा जबाब नोंदवलेला नाही. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.