Wardha Crime: तेरे पास जितने भी पैसे है वो बस दे दे, चाकूचा धाक दाखवून तरुणाला लुटले; वर्ध्यातील धक्कादायक प्रकार
Wardha Crime: श्रीकांत गिरीश तिवारी (28) रा. अकोला. हा हिंगणघाट येथे त्याच्या पत्नीकडे जाण्यासाठी अकोला येथून वर्ध्याला आला. मात्र, वर्ध्यावरुन हिंगणघाटकडे जाण्यासाठी पहाटे एकही गाडी नसल्याने तो पहाटे 6 वाजताच्या सुमारास रेल्वेस्थानकावर जाण्यासाठी एका ऑटोत बसला.
वर्धा: ज्यांच्यावर विश्वास ठेवला जातो त्यांच्याकडूनच विश्वासघात होण्याच्या घटना वारंवार होत असतात. वर्धा (wardha) येथील रेल्वे स्थानक परिसरातही असाच एक प्रकार घडला आहे. रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी रिक्षा केलेलेल्या एका प्रवाशाला (passenger) रिक्षाचालकानेच चाकूचा धाक दाखवून लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ऑटोतून प्रवास करून रेल्वेस्थानकाजवळ पोहचलेल्या प्रवश्याला ऑटोचालक व त्याच्या मित्राने चाकूचा धाक दाखवून लुटल्याची घटना घडलीय. या घटनेत प्रवाश्याजवळील सोन्याची अंगठी आणि आणि रोख रक्कम जबरीने हिसकावून आरोपीनी पळ काढला होता. मात्र घटनेची माहिती होताच शहर पोलिसांनी काही तासांतच आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. मात्र, रिक्षाचालकांकडूनच लुटमार होऊ लागल्याने वर्ध्यात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या प्रकरणी पोलिसांनी (police) गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
श्रीकांत गिरीश तिवारी (28) रा. अकोला. हा हिंगणघाट येथे त्याच्या पत्नीकडे जाण्यासाठी अकोला येथून वर्ध्याला आला. मात्र, वर्ध्यावरुन हिंगणघाटकडे जाण्यासाठी पहाटे एकही गाडी नसल्याने तो पहाटे 6 वाजताच्या सुमारास रेल्वेस्थानकावर जाण्यासाठी एका ऑटोत बसला. ऑटोचालकासोबत आणखी एक जण बसून होता. श्रीकांत हा रेल्वेस्थानक परिसरात पोहचला असता तो लघूशंकेसाठी उतरला. या संधीचा फायदा घेत ऑटोचालक आणि त्याचा मित्र श्रीकांतजवळ गेला आणि चाकूचा धाक दाखवून तेरे पास जितने भी पैसे है वो सब दे दे, असे म्हणत त्याला धमकावले. त्यानंतर या दोघांनी श्रीकांतकडील त्याच्या बोटातील सोन्याची अंगठी आणि खिशातील रोख रक्कम असा एकूण 23 हजार 200 रुपयांचा ऐवज जबरीने हिसकावून घेतला. त्यानंतर या दोघांनी ऑटो घेऊन पळ काढला.
पोलिसी हिसका दाखवताच कबुली
अचानक झालेल्या या प्रकाराने घाबरलेल्या श्रीकांतने तत्काळ शहर पोलीस ठाण्यात धाव घेत याबाबतची तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपीच्या शोधार्थ पथक रवाना केले. त्यानंतर अवघ्या काही तासांतच पोलिसांनी आरोपी विक्की बाबूलाल सोळंकी (26) रा. इतवारा बाजार आणि सूरज सुमेरसिंग गिरी (19) रा. हट्टी पोस्ट फुपटा ता. मानोरा जि. वाशिम यांना ताब्यात घेतली. त्यानंतर या दोघांची कसून विचारपूस केली. मात्र, या दोघांनी गुन्हा कबूल केला नाही. अखेर पोलिसांनी पोलिसी हिसका दाखवताच त्यांनी चोरीची कबूली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून हिसकावून नेलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहे. मात्र, झाल्या प्रकारामुळे वर्ध्यात एकच खळबळ उडाली आहे.