Lawrence Bishnoi : कॉलेजमध्येच पहिला खून, 11 राज्यांत टोळी सक्रिय… कसा गँगस्टर बनला लॉरेन्स बिश्नोई? गुन्ह्यांची संपूर्ण कुंडली
Lawrence Bishnoi : महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमुळे कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचं नाव पुन्हा चर्चेत आल आहे. लॉरेन्स बिश्नोई गुन्हेगारीच्या जगात कसा आला आणि वयाच्या अवघ्या 31 व्या वर्षी तो या जगाचा राजा कसा बनला? या कुख्यात गुंडाची संपूर्ण कुंडली वाचा
माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या या हत्येनंतर कुख्यात गँगस्टर लॉरेन्सचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. प्रदीर्घ काळ काँग्रेसशी संबंधित असलेले आणि फेब्रुवारी महिन्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेले बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोन शूटर्सनी आपण लॉरेन्स गँगचे सदस्य असल्याचे कबूल केले. तर सोशल मीडियावरील एका पोस्टमधून लॉरेन्स गँगने या हत्याकांडाची जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली. तर मुख्य आरोपींसह तिघांचा शोध अद्याप सुरू आहे.
बाबा सिद्दीकी हे महाराष्ट्रातील मोठे राजकारणी होते. तसेच ते मुंबईचे मोठे उद्योगपती होते आणि बॉलिवूडमध्येही त्यांची चांगली पकड होती. अशा परिस्थितीत त्यांच्या हत्येने महाराष्ट्रासह देशभरातील लोकांना धक्का बसला आहे. मुंबई क्राइम ब्रँचच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉरेन्स बिश्नोईने बाबा सिद्दीकीला टार्गेट केले जेणेकरून तो या तीन मोठ्या क्षेत्रांना एकाच वेळी मोठा संदेश देऊ शकेल. या हत्येतून लॉरेन्स बिश्नोई मुंबईतील राजकारणी, बॉलीवूड सेलिब्रिटी आणि बड्या उद्योगपतींना संदेश देऊ इच्छितो की तो बाबा सिद्दीकी यांना मारू शकतो, तर तो कोणालाही संपवू शकतो.
50 गुन्हे दाखल
लॉरेन्स बिश्नोई सध्या गुजरातच्या साबरमती तुरुंगात कैद आहे. त्याच्यावर खून, खुनाच्या उद्देशाने हल्ला, चोरी, दरोडा, खंडणी असे सुमारे 50 गुन्हे दाखल आहेत. सिद्धू मूसवाला आणि जयपूरमध्येकरणी सेनेच्या अध्यक्षाची हत्या तसेच पंजाबी गायक गिप्पी ग्रेवाल आणि एपी धिल्लन यांच्यावर झालेल्या गोळीबारातही त्याचे नाव पुढे आले आहे. अवघ्या 31 वर्षांचा लॉरेन्स बिश्नोई याचं नाव गुन्हेगारी जगतात एवढं मोठं कसं झालं आणि त्याने तुरुंगात बसूनही त्याने असे हायप्रोफाईल गुन्हे कसे केले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
लॉरेन्सचं खरं नाव काय ?
लॉरेन्स बिश्नोई याचं खरं नाव सतविंदर सिंग आहे. त्याचा जन्म 1993 मध्ये पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यातील एका गावात झाला. तेव्हा त्याचे वडील हरियाणा पोलिसात हवालदार होते. बिश्नोईने कॉलेजच्या काळातच गुन्हेगारीच्या जगात प्रवेश केला होता. तो 2010 मध्ये डीएव्ही कॉलेजमध्ये शिकण्यासाठी चंदीगडला गेला. नंतर 2011 मध्ये ते पंजाब युनिव्हर्सिटी कॅम्पस स्टुडंट्स कौन्सिलमध्ये सामील झाला. तेथे त्याची भेट गोल्डी ब्रार या आणखी एका कुख्यात गुंडाशी झाली
कॉलेजमध्ये असतानाच पहिला खून
विद्यार्थी संघटनांच्या निवडणुका लढवण्यासाठी लॉरेन्सने पंजाब विद्यापीठाची स्टुडंट ऑर्गनायझेशन नावाची संघटनाही स्थापन केली होती. यानंतर त्याने मुक्तसर शासकीय महाविद्यालयात विद्यार्थी संघटनेची निवडणूक लढवली, त्यात त्याचा पराभव झाला. या पराभवामुळे लॉरेन्स अत्यंत संतापला आणि त्याने विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीतील विजेत्याची गोळ्या झाडून हत्या केल्याचा आरोप आहे. गुन्हेगारी जगतात हे त्याचे पहिले पाऊल होते आणि एका वर्षाच्या आत म्हणजे 2012 पर्यंत, त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, अतिक्रमण, हल्ला आणि दरोडा यांसारख्या गुन्ह्यांसाठी 7 गुन्हे दाखल झाले. ही सर्व प्रकरणे विद्यार्थी राजकारणाशी संबंधित होती. सूत्रांच्या माहितीनुसार, देशातील पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, पश्चिम बंगाल, उत्तराखंड, महाराष्ट्र, झारखंड आणि गुजरात या 11 राज्यांमध्ये लॉरेन्सचे गुंड सक्रिय आहेत. म्हणजे या राज्यांमध्ये लॉरेन्स कुणाकडूनही सुपारी घेऊ शकतो, कुणालाही मारू शकतो.
लॉरेन्स बिश्नोईची टोळी केवळ भारतातच नाही, तर अनेक देशांमध्ये तिचे कनेक्शन आहेत. लॉरेन्स गँगचे नेटवर्क अमेरिका, कॅनडा, अझरबैजान, पोर्तुगाल, यूएई आणि रशियापर्यंत पसरले आहे. सूत्रांनुसार, रेन्स या देशांमधून अवैध शस्त्रांची तस्करी करतो. तसेच ड्र्ग्स माफियाशीही त्याचा संबंध आहे.एवढंच नव्हे तर भारतात लॉरेन्सची टोळी जे गुन्हे करते, त्यासाठी जे पैसे वापरले जातात, त्यात खंडणीच्या पैशांचा मोठा वाटा आहे. बेकायदेशीर शस्त्रास्त्रे, अमली पदार्थांचा व्यापार, केबलचालकांकडून खंडणी, वाळू माफिया, दारू व्यापारी आणि बिल्डरांकडून वसूली केली जाते. अशी अनेक कामं लॉरेन्स बिश्नोईची टोळी म्हणजेच त्याचे शूटर करत आहेत.
लॉरेन्स बिश्नोई गँगचे कारनामे
– 29 मे 2022 रोजी सिद्धू मूसवाला खून प्रकरणाची जबाबदारी लॉरेन्स गँगचा गँगस्टर गोल्डी ब्रार याने स्वीकारली होती.
– 20 सप्टेंबर 2023 रोजी कॅनडात दहशतवादी सुखदुल सिंगच्या हत्येची जबाबदारीही लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली होती.
– 25 नोव्हेंबर 2023 रोजी लॉरेन्सच्या गँगने पंजाबी गायक गिप्पी ग्रेवालच्या कॅनडातील घरावरही गोळीबार केला होता.
– तर 14 एप्रिल 2024 रोजी मुंबईतील गॅलेक्सी अपार्टमेंटमधील सलमान खानच्या घरावर गोळीबार झाला. त्याची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याने स्वीकारली होती.
– एवढंच नव्हे तर 2 सप्टेंबर 2024 रोजी याच टोळीने पंजाबी गायक एपी धिल्लन यांच्या कॅनडातील घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणाची जबाबदारीही घेतली होती.
लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीत सुमारे 700 सदस्य असल्याची माहिती आहे. लॉरेन्स बिश्नोईने आपल्या टोळीतील प्रत्येकाची विभागणी केली आहे. गोल्डी ब्रार, रोहित गोदारा, अनमोल बिश्नोई आणि कला जाठेदी या सर्वांनी आपापली क्षेत्रे विभागली आहेत, ज्यांचे अहवाल थेट साबरमती कारागृहात असलेल्या लॉरेन्स बिश्नोईला दिले जातात.