Baba Siddiqui Murder : परदेशात बसून अनमोल बिश्नोईने रचला बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट
12 ऑक्टोबरला संपूर्ण राज्यात दसऱ्याचा उत्साह होता. रात्री 9.30 च्या सुमारास बाबा सिद्दीकी हे त्यांचा आमदार मुलगा झीशानच्या वांद्रे येथील कार्यालयादवळ असतानाच तिघांनी त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची दसऱ्याच्या दिवशी ( 12 ऑक्टोबर) झालेल्या हत्येमुळे संपूर्ण राज्य हादरलं. या हाय प्रोफाईल हत्येमुळे देशभरातही खळबळ माजली. मुंबई क्राईम ब्रांच या हत्याकांडाचा तपास करत असून आत्तापर्यत 15 जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये दोन शूटर्सचाही समावेश आहे, ज्यांनी सिद्दीकींवर गोळ्या झाडल्या होत्या. तर इतर आरोपींमध्ये सूत्रधारांसाह हत्येची सुपारी दिलेली इतर आरोपी तसेच त्यांना शस्त्र, पैसा पुरवणारे आरोपी यांचाही समावेश आहे. याप्रकरणाचा पोलीस कसून तपास करत असून रोज नवनवी माहिती समोर येत धक्कादायक खुलासेही होत आहेत.
दरम्यान बिश्नोई गँगने या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या प्राथमिक तपासादरम्यान कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याचे नाव समोर आले असले तरी, पोलिसांना शूटर्स आणि त्याच्यामध्ये स्नॅपचॅट्स सापडल्यानंतर एक नवा खुलासा झाला आहे. सध्या परदेशात लपलेल्या अनमोल बिश्नोई यानेच बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचं सूत्रसंचालन केल्याचं समोर आलंय. अटकेतील आरोपींनी पोलिसांना ही माहिती दिल्याचं समजतंय.
दसऱ्याच्या दिवशी गोळीबार
12 ऑक्टोबरला संपूर्ण राज्यात दसऱ्याचा उत्साह होता. रात्री 9.30 च्या सुमारास बाबा सिद्दीकी हे त्यांचा आमदार मुलगा झीशानच्या वांद्रे येथील कार्यालयादवळ असतानाच तिघांनी त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला. धर्मराज कश्यप, गुरमेल सिंग आणि शिवकुमार गौतम अशी तीन आरोपींची नावे आहेत. त्याप्रकरणी धर्मराज आणि गुरमेल या दोघांना तर पोलिसांनी लागलीच अटक केली. मात्र गर्दीचा फायदा घेत गोळीबार करणारा मुख्य आरोपी शिवकुमार गौतम हा मात्र पळून गेला, तो अद्याप फरार आहे. पोलीस सध्या शिवकमुार गौतम याच्यासह झीशान अख्तर आणि शुभम लोणकर या तिघांचा शोध घेत आहेत.
याप्रकरणी मुंबईतून राम कनौजिया आणि नितीन सप्रे या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. उत्तर प्रदेशातील आरोपींना हत्येची सुपारी देणायापूर्वी शुभम लोणकर याने राम आणि नितीन या दोघांना सिद्दीकींना मारण्याची सुपारी दिली होती, मात्र त्यांनी त्यासाठी 1 कोटींची मागणी केली. हे पैसे खूप जास्त वाटल्याने अखेर शुभमने शिवकुमार, धर्मराज आणि गुरमेल या तिघांना 2 लाख रुपये देत हत्येची सुपारी दिली.
पोलिसांनी धर्मराज, गुरमेल याच्यासह राम कनौजिया, नितीन सप्रे यांच्यासह अनेकांना अटक केली. तर गेल्या आठवड्यात सुजित सुशीलसिंग उर्फ डब्बू यालाही बेड्या ठोकल्या. याच सुजीतने राजस्थानमधून शस्त्रं आणली आणि मारेकऱ्यांना आर्थिक मदत केली, असे पोलिसांनी सांगितले. हत्येच्या एक महिना अगोदर त्याने भाड्याने नेमलेल्या नेमबाजांना सिद्दीकीचे वांद्रे येथील निवासस्थान आणि परिसराची रेकी करण्याच्या सूचना दिल्या होत्या अशी माहितीही पोलिसांनी दिली. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.