शनिवारी रात्री मुंबईसह राज्यभरात दसऱ्याचा उत्साह होता, मात्र तेवढ्यात वांद्रे येथील निर्मलनगर मध्ये घडलेल्या घटनेने सर्वच हादरले. माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची भररस्त्यात गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली. आजूबाजूला सणानिमित्त फटाके फटत असताना, रिक्षातून आलेल्या तिघांनी स्मोक बॉम्ब फोडत धूर केला आणि सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडत त्यांच्या शरीराची अक्षरश: चाळण केली गंभीर जखमी झालेल्या सिद्दीकी यांना लीलावतीमध्ये दाखल करण्यात आलं, पण तेथे त्यांचा मृत्यू झाला. या संपूर्ण हत्याकांडाने प्रचंड खळबळ माजली. पोलिसांनी कसून तपास करत तिघांपैकी दोन मारेकऱ्यांना अटक केली तर हत्येच्या दुसऱ्या दिवशी पुण्यातून आणखी एकाला अटक करण्यात आली, ज्याने हत्येचा कट रचण्यात आणि पैसे पुरवण्यात मदत केली होती. मात्र या हत्याकांडातील मुख आरोपी, शिवकुमार, ज्याने गोळ्या झाडल्या तो अजूनही फरार असून मुख्य सूत्रधार झिशान तसेच फेसूबक पोस्ट करून लॉरेन्स बिश्नोई गँगने हत्या केल्याची कबुली देणारा शुभम लोणकर हे तिघे अजूनही फरार आहेत. त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विविध पथकं तैनात केली असून त्यांचा कसून शोध घेण्यात येत आहे.
दरम्यान वांद्रे येथील निर्मलनगर मध्ये शनिवारी रात्री सिद्दीकींवर जो गोळीबार झाला, तेव्हा ते एकटचे जखमी झाले नाहीत. सिद्दीकी यांच्यासोबतच आणखी एका इसमालाही गोळी लागली. राज कनौजिया असे त्या तरूणाचे नाव असून तो अवघ्या 22 वर्षांचा आहे. त्यालाही गोळी लागली. राजच्या पायावर गोळी लागल्याने तो जखमी झाला. त्यानंतर त्याला स्थानिकांच्या आणि पोलिसांच्या मदतीने वांद्रे येथील भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी त्याचे ऑपरेशन करून गोळी बाहेर काढली आहे.
त्या दिवशी नेमकं काय घडलं ?
22 वर्षांचा राज हा शिलाई काम करतो. दसरा असल्याने त्या दिवशी त्याची संध्याकाळी 5 वाजताच कामावरून सुट्टी झाली. देवीचे दर्शन करण्यासाठी तो आला होता आणि निर्मलनगर येथे एका ठिकाणी उभा राहून ज्यूस पीत होता. मात्र अचानक गोंधळ माजला आणि एकच पळापळ झाली. तेवढ्यात राजच्या पायात वेदना झाल्या म्हणून त्याने निरखून पाहिलं तर त्याच्या पायातून रक्त येत होतं.आजूबाजूला फटाके फुटत होते, त्याला वाटल की त्याच फटाक्यांपैकी एखादा फटाका पायाला लागला असावा अस त्याला वाटलं. तेथे उपस्थित असलेल्यांपैकी काही लोकांनी त्याला बाजूच्याच मंदिरात नेलं तेव्हा त्याच्या पायात गोळी लागल्याचं त्याला समजलं. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं , तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पुढील वर्षी फेब्रुवारी मध्ये राजचं लग्न होणार आहे, अशा परिस्थितीत प्रशासनाकडून काही मदत मिळेल अशी आशा राजला आहे.
पुण्यात रचला कट
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा कट पुण्यातच रचण्यात आला होता. त्यासाठी शूटर्सना सिद्दीकी यांचा फोटो दाखवण्यात आला होता. या हत्येच्या तपासादरम्यान पुण्यातील प्रवीण लोणकर आणि त्याचा भाऊ शुभम लोणकर हे कटातील मुख्य आरोपी असल्याचे पोलिसांनी उघड केले. बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यापूर्वी महिभार त्यांची रेकी करण्यात आली होती. गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराकडे मिरची पावडरचा स्प्रे सापडला, तोही सिद्दीकी यांच्यासाठीच होता. बाबा सिद्दीकी पळून जाऊन नयेत म्हणून त्यांच्या तोडांवर मिरची पावडर स्प्रे करण्याचा आदेश देण्यात आला होता
झिशान सिद्दीकीही टार्गेटवर ?
दरम्यान बाबा सिद्दीक यांच्यासह त्यांचा मुलगा आमदार झीशान सिद्दिकी हा देखील टार्गेटवर असल्याचा पोलिसांना संशय आहे. बाबा सिद्दिकी यांच्यासह झिशानला देखील संपवण्याची सुपारी आरोपींना देण्यात आली, असा पोलिसांना संशय आहे. म्हणूनच दोघेही एकत्र असतील अशी वेळ साधूनच आरोपींनी बाबा सिद्दीकी यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. दोघांना एकत्र मारायचे अन्यथा जो समोर दिसेल त्याला संपवायचे अशी सुपारी मिळाल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे. पण तेव्हा झिशान एका कॉलवर असल्यामुळे तो हल्ल्यातून वाचला.