Baba Siddiqui Murder : हत्येनंतर शूटरचा ‘त्या’ व्यक्तीला फोन, 15 मिनिटं बोलून.. महत्वाचा खुलासा काय ?
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येला जवळपास दीड महीना उलटून गेला आहे. दसऱ्याच्या दिवशी 12 ऑक्टोबर रोजी वांद्रे येथील झिशान सिद्दीकीच्या ऑफीसबाहेर तीन हल्लेखोरांनी बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून हत्या केली. या हत्याप्रकरणी दोन शूटर्सना तत्काळ अटक करण्यात आली.
माजी मंत्री, राजकारणी बाबा सिद्दीकी यांच्या हत्येला जवळपास दीड महीना उलटून गेला आहे. दसऱ्याच्या दिवशी 12 ऑक्टोबर रोजी वांद्रे येथील झिशान सिद्दीकीच्या ऑफीसबाहेर तीन हल्लेखोरांनी बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून हत्या केली. या हत्याप्रकरणी दोन शूटर्सना तत्काळ अटक करण्यात आली तर त्यानतर काही कालावधीने इतर अनेक आरोपींना ताब्यात घेण्यात आले. दरम्यान या हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी, ज्याने गोळ्या झाडल्या तो शिवकुमार गौतम याला काही दिवसांपूर्वीच अटक करण्यात आली. मुंबई पोलीस गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांकडून त्याची चौकशी करण्यात येत असून या तपासात शूटर शिवकुमार गौतम कडून महत्वाचा खुलासा झाला आहे.
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर शिवकुमार गौतम याने हत्येचा सूत्रधार शुभम लोणकर, झीशान अख्तर यांना फोन केला होता, तो त्यांच्याशी किमान 15 मिनिटे बोलला होता, अशी माहिती समोर आली आहे. सिद्दीकींच्या खुनाच्या काही तासानंतर शुभम लोणकर आणि झीशान अख्तर यांच्या सांगण्यावरून शिवकुमारने त्याचा फोन ठाणे स्टेशनजवळील नाल्यात फेकून दिला होता. त्याने जेथे फोन फेकून दिला होता, त्या ठिकाणी गुन्हे शाखेचे अधिकारी फोनचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
शुभमने दिला होता तो सल्ला
एवढेच नव्हे तर शुभम लोणकर याने शिवकुमार याला ठाण्याहून पुण्याला जाणाऱ्या एक्स्प्रेस ट्रेनमध्ये चढण्यास सांगितले होते. हत्येनंतर शिवकुमार याने शुभम लोणकरला फोन केला होता. त्यावेळी शुभमने अनुराग कश्यपला (शिवासोबत अटक केलेला आरोपी) ‘शूटर’ला आश्रय देण्याची आणि नेपाळला पळून जाण्यास मदत करण्याची सूचना केली होती.
दरम्यान याच घटनेचा तपास सुरू असताना रफिक शेख याला पुण्यातून अटक करण्यात आली असून त्याच्या घरातून 20 जिवंत काडतुसे सापडली. याप्रकरणी गुन्हे शाखेने 85 जिवंत काडतुसे आणि 5 पिस्तुलेही जप्त केली आहेत.
अनमोल बिश्नोईचा आश्रयासाठी अमेरिकेत अर्ज
गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईला अटक करण्यात आली आहे. दोन आठवड्यांपूर्वीच गँगस्टर अनमोल बिश्नोईविरोधात अजामीनपात्र वारंट जारी करण्यात आलं होतं. त्यानंतर त्याला आता अटक करण्यात आली आहे. अनमोल बिश्नईला अमेरिकेच्या कॅलीफोर्नियामधून अटक करण्यात आली आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आता अमेरिकन सरकार अनमोल बिश्नोईला भारताच्या स्वाधीन करणार आहे.मात्र गँगस्टर अनमोल बिश्नोईने अमेरिकेत आश्रयासाठी अर्ज केला आहे. अनमोल सध्या अमेरिकेतील आयोवा येथील कारागृहात असून, त्याने प्रत्यार्पण टाळण्यासाठी हा अर्ज केल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्याच्या या अर्जाने प्रत्यार्पणात अडथळा येऊ शकतो. प्रत्यार्पण प्रक्रिया विलंबित करणे असा हा अर्ज करण्यामागे अनमोल बिश्नोईचा मुख्य उद्देश असल्याचे मानले जात आहे.