बापापेक्षा पैसा श्रेष्ठ ! गप्पा मारता मारता वाद झाला, पोटच्या पोरानेच बापाला संपवलं
बदलापूरच्या बेलवली परिसरात मालमत्तेच्या वादातून एका मुलाने त्याच्या वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गणेश कराळे या मुलाने आपल्या वडिलांना अनंत कराळे यांना धारदार शस्त्राने वार करून ठार मारले.

माना के पैसा खुदा नहीं है, पर खुदा की कसम खुदा से कम भी नहीं है… अशी एक म्हण आहे. आजच्या जगात माणसांपेक्षा पैशांचं, संपत्तीचं महत्वचं जास्त आहे. सतत पैसा मिळवणं, चांगली कमाई करणं कोणाला नाही आवडणार, पैशांचा मोह सगळ्यांनाच असतो, पण तो कमावण्यासाठी तुम्ही काय मार्ग वापरता, यावरून तुमची खरी किंमत ठरते. चालत्या बोलत्या माणसांच्या संचयापेक्षा तुम्हाला धनसंचय करणं आवडंत असेल तर मग…
पैसे आणि प्रॉपर्टीच्या वादातून लोकं एकमेकांच्या जीवावर उठतात, नातंही पहात नाहीत. असाच काहीसा प्रकार मुंबईपासून हाकेच्या अंतरावर अंतरावर असलेल्या बदलापूरमध्ये घडला आहे. तिथे पैसे आणि प्रॉपर्टीसाठी एक मुलगा त्याच्या स्वत:च्याच वडिलांच्या जीवावर उठला. त्याने जन्मदात्या पित्यावरच धारदार शस्त्राने वार करून त्यांची हत्या केली. अनंत कराळे असं हत्या झालेल्या वडिलांचं नाव असून बेलवली परिसरात घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी मुलगा गणेश कराळे याला ताब्यात घेतलं आहे. या बयानक हत्याकांडामुळे सध्या बदलापूरमध्ये मात्र प्रचंड खळबळ माजली आहे.
गप्पा मारायला दुकानाच्या मागे गेले पण..
पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बदलापूरच्या बेलवली परिसरात अनंत कराळे यांचा गाळा असून तो खान कॅटरर्स यांना भाड्याने दिला होता. या गाळ्यात अनंत कराळे आणि त्यांचा मुलगा गणेश कराळे हे बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास आले होते. त्यानंतर भाडेकरूंना दुकानाच्या बाहेर काढून ते दुकानाच्या मागच्या बाजूला गप्पा मारण्यासाठी गेले.
मात्र गप्पा मारता मारता त्यांच्यात अचानक वाद झाले. आणि रागाच्या भरात मुलाने, गणेशने त्याच्या वडिलांच्या पोटावर धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अनंत कराळे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच बदलापूर पश्चिम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून अनंत कराळे यांचा मृतदेह ताब्यात घेतला आणि तो पोस्टमॉर्टमसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. आरोपी मुलगा गणेश कराळे याला पोलिसांनी अटक केली असून बदलापूर पश्चिम पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.