मरीन ड्राईव्हवर रात्री फिरताना सावधान, पाहा त्या रात्री काय घडले
मुंबईतील समुद्र किनाऱ्यावर मध्यरात्री हवा खाणे एका तरूणाला चांगलेच महागात पडले, त्याला हटकण्यात आलेच शिवाय भलताच भूर्दंड बसला आहे.
मुंबई : मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर अनेक जण हवा खाण्यासाठी जात असतात. परंतू रात्री उशीरापर्यंत हवाखाण्यासाठी अशाप्रकारे समुद्राच्या किनाऱ्यावर जाणे कधी कधी धोक्याचे ठरू शकते. कारण त्या रात्री एका तरूणाला पोलीसाने चांगलेच हटकत त्याच्या कडून तब्बल अडीच हजाराचा दंड आकारल्याचा प्रकार घडला आहे. त्याने या संदर्भात ट्वीटरवर तक्रार करताच त्यास मुंबई पोलीसाने प्रतिसाद देत या प्रकरणाचा शोध सुरू केला आहे. नेमका काय प्रकार आहे ते पाहूया.
मरिन ड्राईव्हच्या समुद्र किनाऱ्यावर एक विघ्नेश किशन नावाच्या तरूण शनिवारी पहाटे हवा खात बसला होता. रात्री उशीरा त्याला तेथे आलेल्या एका पोलिसाने हटकत एवढ्या उशीरा येथे काय करीत आहेस असे विचारून त्याला धमकावले. तसेच त्याच्याकडून अडीच हजार रूपयाचा दंड आकारल्याची घटना घडली आहे.
विघ्नेश किशन शनिवारी मध्यरात्री 2.18 वाजता मरिन ड्राईव्ह येथे बसला असता त्याला पोलिसाने हटकले आणि त्याच्याकडून अडीच हजाराचा दंड आकारला. त्याच्याजवळ कॅश नसल्याने हा दंड त्या पोलिसाने चक्क गुगल पेवर आकारला. त्या पोलिसाला गुगल पेवर अडीच हजार रूपये भरल्यावर विघ्नेश किशन याने त्या आर्थिक व्यवहाराचा गुगल पे चा स्क्रिन शॉट ट्विटरवर पोस्ट केला. आणि त्या संबंधित पोलिसाची तक्रार समाजमाध्यमावर करीत मुंबई पोलिसांना त्याने टॅग केले.
संबंधित तरूण विघ्नेश किशन याने ट्वीटरवर केलेल्या पोस्टमध्ये आपल्याला लुबाडणाऱ्या पोलिसाचे नाव अतिश जाधव असल्याचे म्हटले आहे. तसेच आपल्याला न्याय मिळावा असेही आवाहन समाजमाध्यमावर करताच. हे ट्वीट समाजमाध्यमावर चांगलेच व्हायरल झाले. रविवारी रात्रीपर्यंत या ट्वीटला सुमारे 1,382 लोकांनी रिट्वीट केले. तर 6.396 लोकांनी या पोस्टला लाईक्स केले. तर 8.21 लाख लोकांनी ही पोस्ट पाहीली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी या ट्वीटला प्रतिसाद देत संबंधित तरूणाला संपूर्ण तपशिल कळविण्याचे आवाहन केले. तसेच पोलिस खात्यातील कोणत्या जवानाने हे कृत्य केले याचा अंतर्गत तपास पोलिसांनी सुरू केला.
सीसीटीव्ही तपास करणार
मुंबई पोलीसांनी फसवणूक झालेल्या या तरूणाला समोर येऊन पोलीसांनी सविस्तर माहिती देण्याचे आवाहन केले आहे. जर त्या तरूणाने नीट माहिती दिल्यास त्याच्या वर्णनावरून संबंधित इसमाला शोधणे सोपे होईल असे पोलीसांचे म्हणणे आहे, तसेच संबंधित ठीकाणाचे सीसीटीव्ही आणि मोबाईल फोन क्रमांकाचा शोध घेणेही पोलीसांनी सुरू केले आहे.