गुटखा तस्करी प्रकरणात शिवसेना जिल्हाप्रमुख अडचणीत, उद्धव ठाकरेंच्या आदेशानंतर उचलबांगडी

| Updated on: Nov 22, 2021 | 9:53 AM

बीड जिल्ह्यात तीन ते चार ठिकाणी गुटख्याच्या गोदामावर छापा घालत प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक कुमावत यांच्या पथकाने लाखो रुपयांचा गुटखा पकडला होता. यावेळी हा सगळा धंदा शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांचा असल्याचे निष्पन्न झाले

गुटखा तस्करी प्रकरणात शिवसेना जिल्हाप्रमुख अडचणीत, उद्धव ठाकरेंच्या आदेशानंतर उचलबांगडी
कुंडलिक खांडे (फोटो - फेसबुक)
Follow us on

बीड : गुटखा तस्करी प्रकरणात गुन्हा दाखल झालेले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या पदाला स्थगिती देण्यात आली आहे. नवीन शिवसेना बीड जिल्हा प्रमुखाची नियुक्ती लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?

पाच दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यात तीन ते चार ठिकाणी गुटख्याच्या गोदामावर छापा घालत प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक कुमावत यांच्या पथकाने लाखो रुपयांचा गुटखा पकडला होता. यावेळी हा सगळा धंदा शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांचा असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर खांडे आणि आबा मुळे यांच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल झाला.

बीड जिल्ह्याच्या इतिहासात एखाद्या जिल्हाप्रमुख पदावर असलेल्या व्यक्तीवर गुटखा तस्करी प्रकरणात गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच घटना आहे. या घटनेनंतर सुद्धा खांडे हे उजळ माथ्याने जिल्ह्यात पक्षाच्या कार्यक्रमात फिरत असल्याचे दिसून आले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडून दखल

या सगळ्या प्रकाराची दखल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना मध्ये बीड जिल्हाप्रमुख पदाला स्थगिती अशा मथळ्याखाली वृत्त देण्यात आले आहे. शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना बीड जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या पदाला स्थगिती देण्यात आली असून नवीन जिल्हाप्रमुखाचे नाव पक्षप्रमुख लवकरच जाहीर करतील असे म्हटले आहे.

शिवसेना सचिवांसमोर जाणं अंगलट

गुटखा तस्करी प्रकरणात कुंडलिक खांडे यांच्यावर बीडच्या केज पोलिसात गुन्हा दाखल होता. खांडे हे फरार झाले होते. पोलीस त्यांचा शोधही घेत होते. मात्र शिवसेना सचिव अनिल देसाई यांच्या बीड दौऱ्यातील एका कार्यक्रमात फरार आरोपी कुंडलिक खांडे हे कार्यक्रमात उघडपणे फिरताना पहायला मिळाले. या प्रकरणी माध्यम प्रतिनिधींनी अनिल देसाई यांना घेराव घातला असता शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे कुंडलिक खांडे यांच्यावर लवकरच कारवाई करतील असे त्यांनी स्पष्ट केले. त्यानुसार कुंडलिक खांडे यांच्यावर पक्षाने कारवाई केले आहे.

कुंडलिक खांडे अनेक आरोपांच्या गर्त्यात

बीड जिल्हा रोजगार हमी असो वा चारा छावणीतील भ्रष्टाचार प्रकरणात खांडे यांच्यावर आरोप झाले आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांच्या जागेत जुगाराचा क्लब देखील सुरू होता. आता थेट गुटखा तस्करी प्रकरणात नाव आल्याने खांडे यांची कुंडली पोलिसांसमोर आली आहे. मात्र गुटखा तस्करी प्रकरणात मला गोवले जात असल्याचा आरोप कुंडलिक खांडे यांनी केलेला होता. आता थेट शिवसेना भवनातून खांडे यांच्यावर कारवाई झाल्याने त्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.


संबंधित बातम्या :

‘पोलिसांना सांगा, हा कुंडलिक खांडेंचा गुटखा आहे, निघून जा’, बीडच्या शिवसेना जिल्हाप्रमुखांची मुजोरी, गुन्हा दाखल