सुनील जाधव, कल्याण : कल्याण लोहमार्ग पोलीस (Kalyan railway police) ठाण्याच्या हद्दीमधील कल्याण ते आंबिवली (Kalyan to Ambivali) हा पट्टा अधिक संवेदनशील झाला आहे. कारण मोबाईल चोरीला जाणे आणि सोनसाखळी खेचून नेण्याच्या घटनांमुळे रेल्वे प्रवासी हैराण झाले आहेत. कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या तीन महिन्यात साडे तीनशे मोबाईल चोरीला गेल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यापैकी 40 टक्के तक्रारीचे निवारण करण्यात रेल्वे पोलीसांना यश आलं आहे. प्रवाशांनी दरवाजामध्ये उभं राहून प्रवास करू नये, गर्दीत प्रवास करताना आपला मोबाईल (mobile) आणि बॅगची काळजी घ्यावी असं आवाहन कल्याण लोहमार्ग पोलिसांनी केलं आहे.
अनेकदा मोबाईल चोरीला गेला, तरी प्रवासी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार देणे टाळतात.त्यामुळे मोबाईल चोरीचा आकडा प्रत्यक्षात अधिक असण्याची शक्यता आहे. प्रवासी अनेकदा लोकलच्या दरवाजामध्ये उभे राहून मोबाईलवर बोलत असतात. विशेषतः रात्रीच्या वेळी प्रवाशांच्या हातावर फटका मारून मोबाईल चोरत आहेत. कल्याण ते आंबिवली दरम्यान अशा घटना अनेकदा घडल्या आहेत. इराणी गँगच्या सोबत असणारे इतर आरोपी अशा प्रकारची कृत्य करत मोबाईल चोरत असल्याचे पोलिसांनी सांगितले. नुकतेच कल्याण लोहमार्ग पोलिसांनी मोबाईल चोरीच्या वाढत्या घटनांचा तपास करताना तीन मुख्य आरोपींना अटक केली आहे. यापैकी दोन आरोपी हे अल्पवयीन असून त्यांच्याकडून एकूण सात गुन्ह्यांची उकल करण्यात पोलीसांना यश आलं आहे. प्रवाशांनी दरवाजामध्ये उभं राहून प्रवास करू नये त्याचप्रमाणे गर्दीत प्रवास करताना आपला मोबाईल आणि बॅगची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आलं आहे.
मुंबईतल्या अनेक स्टेशनच्यामध्ये बाहेर उभे राहणाऱ्या प्रवाशांच्या मोबाईलवरती फटका मारला जातो. मोबाईल खाली पडला की, चोरटे तो ताब्यात घेऊन पुढील गोष्टी करतात. कुर्ला आणि सायन स्टेशनच्यामध्ये सुध्दा अशा पद्धतीचा प्रकार अनेकदा घडला आहे.