Bhandara Crime : दरोड्याच्या तयारीत असलेल्या आठ जणांना अटक, शस्त्रसाठ्यासह दरोड्याचे साहित्य जप्त
भंडाऱ्यात गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाली आहे. चोरी, घरफोडी, हल्ले अशा घटनांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. आज पुन्हा अशीच घटना भंडाऱ्यात उघडकीस आली आहे.
भंडारा / 10 ऑगस्ट 2023 : दरोड्याच्या तयारीत आलेल्या आठ जणांना शस्त्रसाठ्यासह पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून पोलिसांनी दोन वाहनं आणि प्राणघातक शस्त्रे, मिरची पावडर, दोरी, हॉकी स्टिक, लोखंडी रॉड, चाकू, काठ्या आणि सात मोबाईल जप्त केले आहेत. याप्रकरणी भंडारा पोलिसात आर्म ॲक्टसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे भंडारा शहरात मोठी खळबळ माजली आहे. आरोपींपैकी सात जण गोंदिया जिल्ह्यातील तर एक जण भंडारा जिल्ह्यातील रहिवासी आहे. पोलिसांना वेळीच माहिती मिळाली आणि मोठा अनर्थ टळला. वसीम उर्फ टिंकू खान, विनायक नेवारे, शहाबाज शाबीर खान, प्रकाश भालादरे, संकेत बोरकर, संजय पाटील, रोहन ठाकरे आणि रमेश खोब्रागडे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पहाटेच्या सुमारास सापळा रचून आरोपीला अटक
दरोड्याच्या तयारीत काही आरोपी गोंडियातून भंडाऱ्यात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी पहाटेच्या सुमारास गोंदियातून दोन वाहनांतून भंडाऱ्यात येणाऱ्या आरोपींना सापळा रचून अटक केली. आरोपींकडून प्राणघातक शस्त्रे, मिरची पावडर, दोरी, हॉकी स्टिक, लोखंडी रॉड, चाकू, काठ्या असं दरोडा आणि घातपात घडविण्याचे साहित्यासह सात मोबाईल जप्त केले आहेत.
एक आरोपी आमदाराचा निकटवर्तीय
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींपैकी एक आरोपी भंडाऱ्यातील असून, तो राज्यातील सत्ताधारी पक्षाचा कार्यकर्ता आहे. तो भंडाऱ्यातील एका आमदाराचा निकटवर्तीय म्हणून त्याची ओळख आहे.