भंडारा : लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने (NCB) आत्तापर्यंत महाराष्ट्रात (Maharashtra Crime News) अनेक अधिकाऱ्यांना लाच घेताना ताब्यात घेतलं आहे. त्याचबरोबर रोज एखाद्या अधिकाऱ्यावरती कारवाई झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे अधिकारी किती भ्रष्टाचार करीत असतील अशी चर्चा नागरिक करीत आहे. मागच्या आठवड्यात दोन पोलिस अधिकाऱ्यांना एनसीबीने ताब्यात घेतले होते. त्याच्या आगोदर नाशिकच्या तहसिलदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. अशीचं घटना काल भंडारा (Bhandara News) जिल्ह्यात घडली आहे. सहायक पोलिस निरीक्षकाला 10 हजारांच्या लाच रकमेसह अटक करण्यात आली आहे.
मोटर वाहन कायद्यांतर्गत कारवाईतून नाव वगळण्यासाठी भंडारा पोलिस ठाण्यात कार्यरत सहायक पोलिस निरीक्षकानं लाच मागितली होती. 10 हजारांची लाच रक्कम स्विकारत असताना सहायक पोलिस निरीक्षक राजेश साठवणे (45) यांना एनसीबीच्या पथकाने ताब्यात घेतलं आहे. विशेष म्हणजे ही कारवाई रात्री उशिरा झाली असल्याची माहिती मिळाली आहे. या कारवाईमुळं पोलीस विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी लाच मागितली असल्याची माहिती ज्यावेळी एनसीबीच्या अधिकाऱ्यांना मिळाली, त्यावेळी त्यांनी पोलिस अधिकाऱ्याला ताब्यात घेण्यासाठी सापळा लावला होता. तक्रारदार हे 53 वर्षांचे आहेत. त्यांचा मुलगा आणि अन्य तिघांविरुद्ध भंडारा पोलीस ठाण्यात मोटर वाहन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली होती.
मुलगा शाळेत शिक्षण घेत असल्यामुळे त्याच्यावर कारवाई नको, अशी वडिलांची भूमिका होती. मुलाचं नाव त्या प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी १० हजार रुपयांची लाच मागितली होती. भंडारा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं ही कारवाई केली आहे.