Bicycle theft : अल्पवयीन मुलांना आमिष दाखवून करायला लावायचा सायकल चोरी; ‘असा’ झाला आरोपी जेरबंद
कल्याण (Kalyan) शहरात मागील काही दिवसांपासून वाढलेल्या सायकल चोरीच्या (Bicycle theft) गुन्ह्यांचा छडा लावताना पोलिसांनी खडकपाडा परिसरातील उच्चभ्रू सोसायटीच्या सुरक्षारक्षकासह दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
ठाणे : कल्याण (Kalyan) शहरात मागील काही दिवसांपासून वाढलेल्या सायकल चोरीच्या (Bicycle theft) गुन्ह्यांचा छडा लावताना पोलिसांनी खडकपाडा परिसरातील उच्चभ्रू सोसायटीच्या सुरक्षारक्षकासह या सोसायटीतील दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. या त्रिकूटाने चोरलेल्या एक लाख 27 हजार रुपये किमतीच्या 14 सायकली पोलिसांनी (Police) जप्त केल्या आहेत. अल्पवयीन मुलांच्या चौकशीदरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा सुरक्षारक्षक या मुलांना पैशांचे आमिष दाखवून सायकलची चोरी करायला लावायचा. त्यानंतर या मुलांनी चोरी केलेल्या सायकली हा सुरक्षारक्षक विकायचा. सॅड्रीक एबीनिझर असे आरोपीचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सायक चोरीच्या तक्रारीमध्ये वाढ झाली होती. पोलिसांकडून संबंधित प्रकरणाचा तपास चालू होता. अखेर या प्रकरणाचा छेडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. सुरक्षारक्षकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसी खाक्या दाखवताच गुन्ह्याची कबुली
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, कल्याण शहरात महागड्या सायकल चोरीचे प्रमाण वाढले होते. या संदर्भातील तक्रार खडकपाडा पोलीस ठाण्यात दाखल होताच कल्याणचे सहायक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील आणि खडकपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद झिने यांच्या पथकांने सीसीटीव्हीच्या आधारे शोध सुरू केला. एका उच्चभ्रू सोसायटीच्या सुरक्षारक्षकाला खडकपाडा पोलिसांनी कल्याण पश्चिम येथील गुरुदेव हॉटेल येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे सायकल चोरीविषयी विचारणा केली, पोलिसी खाक्या दाखवताच या सुरक्षारक्षकाने गुन्ह्याची कबुली दिली.
1 लाख 27 हजारांचा मुद्देमाल जप्त
सुरक्षारक्षकाने दोन अल्पवयीन मुलांच्या मदतीने परिसरातील महागड्या सायकली चोरून विकत असल्याची कबुली दिली. सॅड्रीक एबीनिझर असे आरोपीचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी 1 लाख 27 हजार किंमतीच्या 14 सायकली हस्तगत केल्या आहेत . दरम्यान आता या आरोपीचा अजून कोणत्या गुन्ह्यात सहभाग आहे का याचा तपास पोलीस करत असून, या प्रकारे त्यांनी नेमक्या किती सायकलिंची चोरी केली? याचाही तपास खडकपाडा पोलिसांकडून सुरू आहे.