बिग बॉस स्पर्धक पुन्हा चोरीच्या आरोपाखाली अटकेत, चोर असूनही त्याच्यावर बनला होता हा सिनेमा
या चोराने नववीतून शाळा सोडली आणि 1993 पासून चोरी करणे सुरू केले. त्याच्या जीवनावर सिनेमा आला होता. त्याला बिग बॉसमध्येही सहभागी व्हायला मिळाले होते.
नवी दिल्ली : एका चोराच्या कारवायामुळे उत्तर भारतात धुमाकुळ माजला होता. त्याच्या चोरीची स्टाईलही अगदी वेगळी आहे. त्याची फॅन्सी कार आणि महागडी घड्याळे ही कमजोरी आहे. त्यासाठी तो चोरी करताना मध्य रात्री 2 ते सकाळी 6 हीच वेळ निवडत असतो. हा सुपर चोर दिल्लीच्या पॉश इलाका असलेल्या ग्रेटर कैलाश परीसरात झालेल्या दोन चोऱ्यांप्रकरणी पोलिसांना हवा होता. या दोन घरातून लाखो रूपयाचं मौल्यवान सामान चोरी झाले होते. अखेर त्याला कानपूरवरून पकडण्यात यश आले आहे.
बंटी ऊर्फ देवेंद्र याला कानपूरवरुन दिल्ली पोलिसांनी अखेर अटक केली आहे. बंटीला यापूर्वी देखील बऱ्याचदा पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर पाचशेहून अधिक चोऱ्यांचा आरोप आहे. बंटीची चोरी करण्याची पद्धतही अगदी हटके आहे. त्याच्यावर एक चित्रपटही मागे आला होता.
शिक्षण अर्धवट सोडून करू लागला चोरी
बंटी याने इयत्ता नववीमध्ये शाळा सोडली. आणि त्याने साल 1993 चोरी करायला सुरूवात केली. त्याला प्रथम नवी दिल्ली येथे पोलिसांनी अटक केली होती. परंतू तो पोलिसांच्या तावडीतून पसार झाला. बंटी याने कधी चोरीच्या पैशातून संपत्ती बनविली नाही. तो नेहमीच फाईव्ह स्टारमध्येच रहायचा. त्याला फॅन्सी कार आणि लक्झरी घड्याळांचा सोस होता. त्याची ती कमजोरीच होती.
चित्रपट आणि बिग बॉस
बंटी याच्या जीवनावर बॉलिवूडने साल 2008 मध्ये ‘ओए लकी, ओए लकी’ नावाचा एक सिनेमाही तयार केला होता. साल 2013 मध्ये तीन वर्षांची शिक्षा संपवून तो बाहेर आला तेव्हा त्याने यापुढे कधीही चोरी न करण्याची शपथ घेतली होती. त्यामुळे त्याची बिग बॉसमध्येही एण्ट्री झाली होती. परंतू तेथे तो फार काळ टीकला नाही. बिग बॉसमध्ये शिवीगाळ केल्याने त्याला लवकरच शोमधून बाहेर काढले होते. परंतू त्यानंतरही बंटी अजिबात सुधारला नाही. वर्षभरानंतर तो सीसीटीव्हीत चोरी करताना सापडला.
चोरीचा आहे खास पॅटर्न
बंटीचा चोरीचा एक खास पॅटर्न आहे. असे म्हटले जाते की तो मध्यरात्री 2 ते सकाळी 6 या वेळेतच चोरी करण्याचा प्रघात सुरू केला होता. तो नेहमी चोरी करताना लक्झरी कार, ज्वेलरी, विदेशी घड्याळे, एण्टीक फर्निचरची निवड करायचा आणि मोठ्या खुबीने त्या वस्तू पळवायचा. कार चोरताना कधीही तो कारचे लॉक तोडायचा नाही. तर कारमालकाच्या चावीनेच तो कारचा दरवाजा उघडून ती आरामात पळवायचा असे सूत्रांनी सांगितले आहे.